४०६ डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
का झाले हे माहीत नाही. यापुढे हे दोन भेद महार समाजात का चालू ठेवावे हेही कोणी सांगू शकत नाही. असे जर आहे तर बेले व पान महार यांच्यात भोजन व विवाह का होऊ नयेत ? पूर्वापार वडिलांची चाल हे कोणी कारण सांगू शकतील. परंतु पूर्वापार चालत आलेल्या वडिलांच्या चालीच चालवावयाच्या असतील तर आपणास त्यांच्यासारखेच खितपत पडावे लागेल याचा विचार करा. परिस्थिती अगदी निराळी होती. त्यांना पूर्ण अज्ञानात ठेवण्यात आले होते. त्यांची परिस्थिती पूर्ण गुलामीची होती. त्यांना राजकीय, धार्मिक सामर्थ्य नव्हते, त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट होती. वडिलांच्या चुकांमुळेच आज आपणास दुःख भोगावे लागत आहे. हे दुःख नाहीसे होऊन आपल्या मुलाबाळास सुख लाभावे असे आपणास वाटत असल्यास आपण वडिलांनी केलेल्या चुका दुरूस्त केल्या पाहिजेत. या बाबतीत जुन्या लोकांपेक्षा तरुणांवर जास्त जबाबदारी आहे. ती जबाबदारी ते पार पाडतील अशी माझी खात्री आहे. या आपसातील भेदामुळे आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात बोडिंग निघू शकले नाही. तोच अनुभव सार्वजनिक चळवळीतही येत आहे. समजा एका गावात बेले महार व पान महार अशा दोन्ही पोटभेदाचे लोक असले तर एकाने मृतमांस खाण्याचे सोडून दिले तर दुसरा ते खातो आणि त्यामुळे होते काय की, दोघांवरही गावच्या लोकांचे वर्चस्व वाढते. परंतु त्यांच्यात भेद नसेल तर असा दुष्परिणाम होणार नाही. आपली प्रगती करून घेण्यासाठी आपण जातीभेद मोडला पाहिजे.
आपल्यातील ही भेदाची घाण काढून टाकली तरच आपणास दुसऱ्याला तशीच घाण काढून टाकण्यास सांगता येईल.
मला आनंद वाटतो की, अशाप्रकारचे जोराचे प्रयत्न आपल्या लोकात सुरू झाले आहेत व थोड्याच दिवसात आपल्यातले हे भेद नाहीसे होतील अशी माझी खात्री आहे. आजच्या प्रसंगाबद्दल मी सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो.
७ ७ ७