२२-४-१९३३ कूपमंडूकपणाची वृत्ती सोडून सार्वजनिक कामाला पैसा द्या ! - Page 451

७१
कूपमंडूकपणाची वृत्ती सोडून
सार्वजनिक कामाला पेसा द्या !

तारीख २२ एप्रिल १९३३ रोजी रावबहादूर एस. के. बोले, एम. एल. सी., जे. पी. मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली जी. आय. पी. रेल्वे पोर्टर चाळ, कुर्ला येथे रात्री साडेनऊ वाजता कुर्ला येथील अस्पृश्य समाजातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस एक मानपत्र व ८० रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. प्रथम ठरले होते की, डॉ. बाबासाहेब आल्यावर त्यांची कुर्ला स्टेशनपासून डॉ. आंबेडकर रोड, जुम्मा मसजिद रोड, शिवाजी रोड़ या रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात येईल व त्या दृष्टीने तेथील अस्पृश्य जनतेने मोठ्या उत्साहाने एकंदर तयारीही ठेविली होती. परंतु वेळेच्या अभावी सदर कार्यक्रम एकाएकी बंद करावा लागला, त्यामुळे लोकांची अतिशय निराशा झाली. तरीही मुख्य कार्यक्रम अत्यंत उत्साहाने पार पडला. अध्यक्ष रावबहादूर बोले हे रीतसर स्थानापन्न झाल्यावर रा. कर्डक यांनी मानपत्र वाचून दाखविले व अध्यक्षांच्या हस्ते मानपत्र व ८० रुपयांची थैली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस अर्पण करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हारतुरे घालून गौरव केल्यावर ते बोलावयास उभे राहिले, ते म्हणाले,

जमलेल्या समुदायाकडे पाहून मला पाचसात वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रसंगाची आठवण होते. geata येण्याची ही माझी दुसरी वेळ होय.

पाचसात वर्षापूर्वी मी अध्यक्ष व्हावे असे आमंत्रण येथील लोकांनी मला दिले होते. ते दिवस पावसाचे असूनही मी ठरलेल्या वेळी आलो होतो. परंतु आश्चर्य हे की, सभेच्या ठिकाणी कोणीच नव्हते. मला त्याचे अत्यंत मोठे आश्चर्य वाटले. प्रत्येक ठिकाणी माझ्या सभेला असंख्य लोक जमत असून येथे असे का झाले याची चौकशी केल्यावर मला समजले की, त्या सभेचे हँडबिल फक्त नाशिक जिल्ह्याच्या लोकांनीच काढले होते. त्यावर नगर, सातारा इत्यादी जिल्ह्यांच्या लोकांची नावे नव्हती म्हणून असे झाले. ज्या वेळेस या समारंभाचे आमंत्रण देण्यास येथील लोक आले त्यावेळेस मी त्यांना सांगितले की सर्व लोकांतफें कार्यक्रम होत असेल तर मी येतो, त्यांनी ते कबूल केले व त्याचप्रमाणे घडवून आणिले, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करितो. सर्वांनी जुटीने वागणे अत्यंत जरूर आहे. एकाचे दुःख ते सर्वाचे दुःख अशी वृत्ती सर्वांनी ठेविली पाहिजे. आपल्यापुरते पाहण्याची व कूपर्मडूकपणाची वृत्ती सोडून द्या.

जनता : २९ एप्रिल १९३३.