२२-४-१९३३ कूपमंडूकपणाची वृत्ती सोडून सार्वजनिक कामाला पैसा द्या ! - Page 452

४०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

नुम्ही सथ एक झाल्याबद्दल मला आनंद होत आहे. मानपत्र अर्पण करून तुम्ही जो माझा गौरव केला आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

शैलीत दिलेले हे पैसे मी माझ्या प्रपंचाला लावणार नाही. यापूर्वी पुष्कळ पैसे मला मिळालेले आहेत. परंतु त्यापैकी एक पैही मी माझ्यासाठी घेतली नाही. हे सर्व पैसे मी सार्वजनिक कामाला लाविले आहे व तुम्ही आज दिलेले पैसेही मी सार्वजनिक कार्याला देणार आहे. या ठिकाणी जमलेले लोक पाचसहा हजार तरी होतील. एवढ्या लोकसमुदायाकडून फक्त ८० रुपयेच सार्वजनिक कार्याला मिळतात, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आता त्याबद्दल काही करता येणार नाही. परंतु पुढे केव्हा तरी याची भरपाई होईल, अशी मला आशा आहे. सार्वजनिक काम पैशाशिवाय होत नाही. काम करणाऱ्याला वेतन देणे जरूर आहे. काही माणसे सार्वजनिक काम फुकट करतात. परंतु सर्वच लोक फुकट काम करणे शक्य नाही. आपल्या ' जनता ' पत्रामध्ये ५-६ माणसे लिहिण्याचे काम करतात. इतर ठिकाणी अशा कामाबद्दल दरमहा १००-२०० रु. द्यावे लागतात. परंतु पाच-सात वर्षांपासून हे लोक मोबदला न घेता अग्रलेख वगैरे लिहिण्याचे काम करतात. तीच गोष्ट ' भारत भूषण ' प्रेसची. या छापखान्यात व्यवस्थापक वगैरे जी मंडळी आहेत त्यांना कमीत कमी पगार दिला जातो. हे लोक स्वार्थत्याग करणारे आहेत म्हणून ठीक आहे. परंतु नेहमीच असे चालणे शक्य नाही. म्हणून तुम्ही पैसे दिले पाहिजेत.