२३-४-१९३३ या देशात इंग्रज सरकार काहीच करीत नाही - Page 453

७२
या देशात इंग्रज सरकार काहीच करीत नाही

पूर्वी जाहीर झाल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा व इतर ठिकाणचे लोक या सर्वातर्फ मानपत्रे व थैल्या अर्पण करण्याचा संयुक्त समारंभ बादशाही थाटात पार पडला. तारीख २३ एप्रिल १९३३ रोजी रात्रौ ९ वाजता मुंबईच्या दामोदर हॉल मागील भव्य पटांगणात शृंगारून तयार केलेल्या मंडपात कोच, खुर्च्या वगैरे मांडून स्टेज तयार करण्यात आले होते. पाहाणारास एखाद्या राजाचा दरबारच भरला आहे असे वाटत होते. सदर समारंभास बरीच बाहेर गावची मंडळीही हजर होती. एकंदर जनसमुदाय ८-१० हजार असेल. स्टेजवर उंचावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अध्यक्ष रावबहादूर बोले व डॉ. सोळंकी साहेब बसले होते. त्यांच्या भोवती कोचावर श्री. सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक, भाई प्रधान, डॉ. प्रधान, सौ. सरलाबाई प्रधान, प्रो. कंगले, सौ. गीताबाई कंगले, असवेकर, कवळी, खांडके, भाई चित्रे, कमलाकांत चित्रे, रणखांबे, भाऊराव गायकवाड, दाणी, काळे, जाधव इत्यादि मंडळी विराजमान झाली होती. सदर समारंभाची व्यवस्था ठेवण्यासाठी माहीम चाळ, नायगाव, रेतीचा धक्का, डिलाईल रोड, सैतान चौकी, फत्तरबंदर, करीरोड, वाडिया हॉस्पिटल, सँडहर्स्ट रोड, कोळी वाडा, क्लार्क रोड, आर्थर रोड, वडाळा, शिव, माटूंगा इत्यादि ठिकाणचे yoo च्या वर समता सैनिक दलाचे लाठीबंद सैनिक सर्व समारंभाच्या भोवती कोट करून जय्यत तयार होते. प्रथम रा. दिवाकर नेवजी पगारे यांनी अध्यक्षाची सूचना आणिली व तिला रा. शंकरराव लिंबाजी , ओझरकर यांनी अनुमोदन दिल्यावर नियोजित अध्यक्ष रावबहादूर एस. के. बोले, एम. एल. सी., जे. पी., मुंबई यांनी अध्यक्षस्थान सुशोभित केले. त्यांनी आपले प्रास्ताविक भाषण केले. भाषणात ते म्हणाले की, जमलेल्या समाजावरून तुमच्यात किती जागृती झाली आहे ते दिसून येते. तुम्हाला गाढ झोपेतून जागृत करण्याचे श्रेय डॉ. आंबेडकरांना आहे.

डॉ. आंबेडकर आपल्या समाजात जन्मास आल्याबद्दल आपला समाज भाग्यवान आहे. सर्व जगाचे पुढारी होण्यास ते लायक आहेत. त्यांची लायब्ररी पाहिली असता त्यांचे वाचन किती दांडगे आहे त्याची थोडीशी कल्पना येईल. राऊंड टेबल परिषदेमध्ये राज्यघटनेसंबंधी पुस्तके स्वखर्चाने विकत घेऊन त्यांनी राजकारणाचा अभ्यास केला आहे. काही लोक म्हणतात त्यांची जातिविषयक

जनता : २९ एप्रिल १९३३. _.-