या देशात इंग्रज सरकार काहीच करीत नाही ४११
आशा आहे. त्यानंतर वांद्रे, डिलाईल रोड वगैरे ठिकाणचे मंडळीतर्फे अनेक हार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांस अर्पण करण्यात आले.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. ते म्हणाले,
अध्यक्ष महाराज, प्रिय बंधु आणि भगिनींनो,
आज या समारंभाला आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालात ही माझ्या दृष्टिने फार समाधानकारक गोष्ट आहे. कारण, जर पूर्वी इच्छिल्याप्रमाणे दरेक जिल्ह्याच्या लोकांनी निरनिराळे कार्यक्रम केले असते तर मला त्यांना हजर राहणे अशक्य झाले असते. शिवाय, आज जमला इतका लोकसमुदाय एकत्रित होण्याचा प्रसंगही लाभला नसता. दुसरी गोष्ट उद्या बंदरावर सर्वानी येऊन निरोप देण्याचा जो अतिप्रसंग होणार होता तो उद्या होण्याचे काही कारण नाही. याच ठिकाणी मी तुमचा व तुम्ही माझा निरोप घेऊ या. बंदरावर येऊन तुम्ही जो गोंगाट व जयध्वनी करता त्यामुळे मी स्वतः गांगरतो. तसेच माझ्याबरोबर बोटीने जाणाऱ्या प्रतिनिधींच्या मनाला संकोचही वाटत असेल. पुष्कळ लोकांना निरोप देताना कधी कधी चार माणसेही हजर नसतात परंतु मी मात्र याला अपवाद आहे. कारण माझ्यावेळी किडा-मुंगीलाही जागा होणार नाही इतकी माणसे बंदरावर येतात. ही अनर्थाची गोष्ट आहे. गरीब लोकांनी आपला रोजमुरा बुडवून बंदरावर मला पोहोचविण्यास हजर राहावे ही गोष्ट मला उचित व पसंत वाटत नाही. तेव्हा तुम्ही उद्या कोणीही बंदरावर येऊ नये. येथेच एकमेकांना जे काही सांगावयाचे असेल ते सांगता येईल. ज्या जिल्ह्यांतफं ही मानपत्रे देण्यात आली त्यांच्या संस्थाचालकांचे मी आभार मानतो.
गेल्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील मानपत्राचे वेळी मी केलेल्या भाषणाचा असा व इतक्या लवकर परिणाम होईल, असे मला वाटत नव्हते. परंतु तुम्हाला समाजकार्याची पूर्ण जाणीव झाली असल्यामुळे समाजकार्य उत्तम तऱ्हेने चालावे यासाठी एकी करून तुम्ही थोड्या अवधीत ज्या आज थैल्या अर्पण केल्या आहेत त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. |
मला काल व आज मिळालेल्या निधीचा विनियोग मी समाज कार्याकडेच करणार आहे. त्यासाठी मी एक योजना ठरविली आहे. माझ्या मनातून समाजातील लोकांना चांगल्याप्रकारचे ज्ञान प्राप्त होईल, अशा प्रकारची व्यवस्था करण्याचे पुष्कळ दिवसापासून होते. मुलांनी शाळेत जाऊन चांगले शिक्षण घेतले पाहिजे. त्याप्रमाणे वयात आलेल्या स्त्री-पुरुषांनाही नवीन, चांगले सुधारणेला कारणीभूत होईल असे ज्ञान प्राप्त होणे जरूर आहे. त्यासाठी कमीत कमी चार आणे किंमतीची उपयुक्त व चांगल्या माहितीने भरलेली अशी पुस्तके