४२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
नमूद केले आहे की, ' जातीजातीत वाद सलोख्याने न मिटल्यामुळे हा जातीय निर्णय सरकारास देणे भाग पडले. म्हणजे -हा वाद आपसात मिटला असता तर सरकारला निर्णय देणे जरूर पडले नसते आणि यदाकदाचित हिंदुस्थानात कोणत्याही जातीत यापुढे आपसात समजुतीने तडजोड झाल्यास ती सरकार जरूर मान्य करील. ' पुणे करार या प्रकारची तडजोड आहे व ती तडजोड सरकारने पूर्णाशाने मान्य केली आहे. जातीय निर्णयात फक्त प्रान्तिक कौन्सिलातील जागांची वाटणी समाविष्ट आहे. त्यात वरिष्ठ कायदे कौन्सिलातील जागांचा उल्लेख नाही. पुणे करारात या दोनही कौन्सिलातील जागांची वाटणी झाली आहे आणि सरकारतर्फे ज्या वेळेस पुणे करारास मान्यता मिळाली त्या वेळेस सरकारने कम्युनल अवॉर्ड (जातवार निवाडा) मधील प्रान्तिक कौन्सिलातील जागांची वाटणी बदलून पुणे करारातील प्रान्तिक जागांची वाटणी ग्राह्य धरली व वरिष्ठ कायदे कौन्सिलासंबंधी पुणे करारात समाविष्ट केलेले प्रमाण मान्य केले व त्याच तत्त्वानुसार पुढे व्हाईट पेपरमध्ये पुणे करारातील वरिष्ठ कौन्सिलातील जागांचे प्रमाण ठरविले. म्हणजे पुणे करारात झालेल्या हिंदू व अस्पृश्यांमध्ये तडजोडीचे तत्त्व सरकारच्या कम्युनल अवॉर्डच्या पाचव्या कलमानुसार मान्य केले व त्यावर आपले शिक्कामोर्तब मारले. या करारात कोणत्याही प्रकारचा बदल करणे झाल्यास तो सरकारला करता येणार नाही किंवा एकट्या हिंदूस करता येणार नाही. तो बदल हिंदू व अस्पृश्य यांनाच आपसातील परस्पर चर्चेने करण्याचा अधिकार आहे. अन्य कोणत्याही मार्गाने फरक होऊ शकत नाही आणि म्हणून तुम्हास याबाबतीत निःशंक राहाण्यास
प्रत्यवाय नाही.
आता हिंदुंकडून कदाचित असे सांगण्यात येईल की ज्या वेळेस दोन पक्षात करार होतो त्यावेळेस कोणताही पक्ष संकटात असता कामा नये. महात्मा गांधींनी आपले प्राण पणास लावले व त्यामुळे अशी परिस्थिती उत्पन्न झाली की त्यांचे प्राण वाचविण्याची जबाबदारी माझ्यावर पडली, त्यावेळी सर्व हिंदू समाज माझ्यावर संतप्त झाला होता. मी नमते घेऊन त्वरेने कसातरी करार घडवून आणावा म्हणून चोहो बाजूने मला पेचात धरले होते. देशातील कित्येक तरुण माझा जीव घेण्यास सज्ज झाले होते. बंगाल्यातील अत्याचारी तरुणांकडून मला धमकीची पत्रे येत होती. कोणत्याही प्रकारे महात्मा गांधींच्या जीवितास अपाय झाल्यास मला त्याबद्दल जबाबदार धरून माझे प्राण धोक्यात तर येतीलच पण असहाय अशा सर्व अस्पृश्य समाजावर हिंदू समाजाकडून सूड घेतल्या जाईल,