२९-९-१९३४ गुलाम म्हणून अपमान किती दिवस सहन करणार ? - Page 467

गुलाम म्हणून अपमान किती दिवस सहन करणार ? ४२३

हे भीषण चित्र माझ्या डोळ्यांपुढे होते. अशा मनःस्थितीत प्रतिपक्षाजवळ वाटाघाट करून मला करारावर सही करावी लागली. असे असता आपले प्राण संकटात होते, म्हणून करार मान्य करणे आपल्याला भाग पडले, असे म्हणण्याचा कुणालाही हक्क पोचत असेल तर कायद्याच्या दृष्टीने तो मला पोचत आहे, यात शंका नाही.

परंतु पुणे करारातील सर्व बाबी माझ्या मताप्रमाणे जरी घडून आल्या नसल्या तरी या प्रकारचा हक्क बजावण्यास मी तयार नाही. मी पुणे कराराच्या बाबतीत इमानी राहाणार आहे. अशा प्रकारे पुणे करार अभेद्य राखण्यास अस्पृश्य समाज तयार असला तरी सर्व हिंदू समाज तसेच वर्तन ठेवील असे म्हणवत नाही. आणि हिदू समाजातील कित्येक जबाबदार पुढारी व संस्था यांच्या अलिकडच्या चळवळी पाहिल्या व उद्गार ऐकले तर हिंदू समाज पुणे करारास इमानी राहील किंवा नाही याची मला जबरदस्त शंका वाटते आणि याकरिता आपण जागरूक राहून आपल्याला मिळालेल्या हक्कांचे संरक्षण केले पाहिजे

आजच्या काही वक्त्यांनी पुणे करारास गांधी-आंबेडकर या नावाने संबोधिले. पण ते चुकीचे आहे. या करारावर महात्मा गांधी यांची सही नाही. महात्मा गांधी हे हिंदुंचे पुढारी गणले जात नाहीत. हिंदू समाजाचे खरे पुढारी पं. मदन मोहन मालवीय हे आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली अखिल भारतीय हिंदू समाजाचे पुढारी म्हणून त्या वेळच्या सर्व वाटाघाटी चालू होत्या आणि या नात्यानेच करारावर पहिली सही पं. मदन मोहन मालवीय यांची आहे. आपल्या सर्वमान्य पुढाऱ्याच्या शब्दांची हिंदू समाजाला चाड नसेल तर त्या समाजासारखा कृतघ्न व निर्लज्ज दुसरा समाज नाही, असे म्हणावे लागेल, पण मला आशा आहे की, हिंदू पुढारी आपल्या शब्दास जागतील.

अस्पृश्य समाजास आपल्या शब्दांची चाड आहे. हेच जाहीर करण्याकरिता तुम्ही आज येथे जमला आहात, असे मी समजतो. परंतु याच वेळी मी तुम्हास हे सांगू इच्छितो की गेल्या वर्षापासून पुणे करार दिन पाळण्याची जी तुम्ही प्रथा पाडली आहे ती एक केवळ प्रथा म्हणूनच तुम्ही समजता कामा नये. एक दिवस एके ठिकाणी जमून इतर वार्षिक उत्सवाप्रमाणे हा उत्सव साजरा करण्याचा, ५-२ वक्त्यांची भाषणे करावयाची व आपण कृत-कृत्य झालो म्हणून समजावयाचे इतक्या साध्या किंवा इतक्या हीन दर्जाचा हा दिन नव्हे. पुणे करार हा अस्पृश्यांच्या इतिहासात एक चिरस्मरणीय असा प्रसंग आहे. या कराराच्या द्वारे आपल्या समाजाने बेदरकार हिंदू समाजास आपले राजकीय अस्तित्व कबूल करण्यास भाग पाडले आहे. याकरिता तो आपला राजकीय दिन म्हणून आपण पाळला पाहिजे. पुणे करारान्वये आपल्या समाजास मिळालेले अधिकार आपण योग्य रीतीने उपयोगात आणतो की नाही, हे पाहाण्याकरिता आपण या दिवशी जमले पाहिजे.