४२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मुंबई प्रांताकरिता तुम्हास १५ जागा अडविण्याकरिता उभे राहणारे उमेदवार
आपल्या समाजाचे खरे प्रतिनिधी आहेत किंवा नाहीत हे पाहून आपण त्यांची निवड
करावयास हवी. या १५ प्रतिनिधींपैकी जर ५ भांडवलदारांच्या हाती गेले, ५ हिंदू
समाजाचे हस्तक बनले तर राहिलेल्या पाचांचा काय उपयोग आहे ? याकरिता
या १५ प्रतिनिधींच्या बाबतीत तुम्ही दक्ष राहिले पाहिजे, तरच मिळालेल्या हक्कांची
सांगता होईल व अस्पृश्य समाजाचे पाऊल पुढे पडेल.
पुढील काळात प्रत्येकाने कर्तबगार बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बापाच्या नावावर खपण्याची हाव सोडून मी स्वतः काहीतरी करून दाखवीन अशी महत्त्वाकांक्षा मनात स्मरण केली पाहिजे. याबाबतीत मला एक साधा दृष्टांत द्यावासा वाटतो. एका सुभेदाराच्या मुलाची गोष्ट माझ्या पाहण्यात आहे. या गृहस्थाचा नेहमी असा अट्टाहास असे की लोकांनी आपल्यास, बापाप्रमाणेच सुभेदार म्हणावे. याकरता आपल्या खोलीच्या दारावरील नावाच्या पाटीवर देखील सुभेदार ही पदवी तो लावीत असे. सुभेदार म्हणून जर कोणी बोलविले तरच आपण तेथे जावयाचे असे त्याचे वर्तन असे. अर्थातच मिलिटरीमधील ही मानाची पदवी त्याच्या बापाची असून ती या मुलाने कमविलेली नाही हे जाणून लोक'सुभेदार ही पदवी त्यास बहाल करण्यास तयार झाले नाहीत. या इसमाने कोणत्याही प्रकारे आपली लायकी वाढविण्याचा प्रयत्न केला नाही व आपल्या मूर्खपणाचे केवळ प्रदर्शन करून तो लोकांच्या उपहासास मात्र पात्र झाला. करिता . भूतकालीन मोठेपणाचा वृथा अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे. अंगी मोठेपणा आणण्यास मनुष्याने स्वतःच झटले पाहिजे. बापाचे मोठेपण मुलाच्या कामी येणार नाही. आणि ही योग्यता अंगी आणण्याकरिता शिक्षण संपादन करण्यासारखा दुसरा उपाय नाही
आपल्यातील शिक्षणाच्या अभावी उच्च दर्जाच्या नोकऱया तुम्हास कशा संपादन करता येतील? सरकारने एक नुकतेच पत्रक काढून मुसलमान समाजाकरिता निरनिराळया खात्यात जाया राखून ठेवल्याचे जाहीर केले आहे. त्या जागा भरण्याकरिता लायक माणसांची निवड करण्यास मुसलमान समाजात वाव आहे. अस्पृश्य समाजाकरता अशा प्रकारची व्यवस्था करण्याची सरकारची तयारी असली तरी त्या जागा भरण्याकरिता लायक माणसे आपल्या समाजात कशी मिळणार ? तुमच्या समाजाकरिता नोकऱ्या राखावयास पाहिजे, पण तुमची लोकसंख्या जरी मोठी असली तरी त्यात सुशिक्षित माणसांचा अभाव असल्याकारणाने तशी व्यवस्था करता येणे शक्य नाही, असा सरकारने जबाब दिल्यास आपण काय सांगणार ? तरी उच्च दर्जाच्या नोकऱ्या मिळवून समाजात आपली प्रतिष्ठा वाढवावयाची असेल तर आपल्या मुलास योग्य ते शिक्षण देणे हे प्रत्येक व्यक्तिचे काम आहे