गुलाम म्हणून अपमान किती दिवस सहन करणार ? ४२५
_ शाळेतील या शिक्षणाबरोबरच देशातील चाललेल्या हालचालीचे शिक्षण घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. सध्याचा काळ म्हणजे आपल्या समाजाचा संक्रमणाचा काळ आहे. पूर्वीच्या मनूतून नव्या मनूमध्ये अस्पृश्य समाज प्रवेश करीत आहे. अशा महत्त्वाच्या काळात आपण डोळ्यात तेल घालून जागले पाहिजे. निरनिराळ्या ठिकाणी काय चालले आहे, आपल्या उन्नतीच्या मार्गात किंवा आपण आखलेल्या प्रगतीच्या मार्गात कोण आड येत आहे, आपल्या समाजातल्या प्रतिपक्षाच्या हालचाली काय आहेत, नाशिकाला काय चालले आहे, नागपुरात काय घडत आहे किंवा कोकणात काय प्रकार चालला आहे, याचे यथार्थ ज्ञान होऊन आपणा सर्वात एक संवेदना उत्पन्न झाली,पाहिजे व त्याप्रमाणे उपाययोजना आपण केली पाहिजे आणि हे घडणे आपल्या समाजाचे एक जोरकस व स्वतंत्र वृत्तीचे व स्वावलंबी वर्तमानपत्र असल्याशिवाय होणार नाही. या कार्याकडे तुमच्यापैकी प्रत्येकाने आपले लक्ष पुरवून आपले वर्तमान- पत्र जिवंत ठेवणे हे पवित्र कर्तव्य आहे, असे समजले पाहिजे. आणिया शैक्षणिक कार्यात आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की त्यात परावलंबनाचा लवलेशही असता कामा नसे. |
अस्पृश्य समाजातील मुलामुलींस शिष्यवृत्त्या देण्याबद्दल हल्ली जिकडे तिकडे घोषणा चालू आहे. परंतु मला मोठी भीती वाटते की, स्पृश्य वर्गाकडून येणाऱ्या पैशाच्या प्रवाहाने गुलामवृत्ती बळावल्याशिवाय राहणार नाही, शिष्यवृत्ती स्वीकारणारी कच्च्या दिलाची मुले शिष्यवृत्ती देणाऱ्या वर्गाचे दास बनल्याशिवाय राहणार नाहीत. मनुष्यप्राणी पैशाचा दास बनतो. महाभारतातील गोष्ट घ्या. भीष्माचार्यासारख्या सत्यनिष्ठ पुरूषास माहीत होते की कौरवांचा [पक्ष ] न्यायाचा नाही. पांडवांच्या मागण्या सर्वस्वी न्याय्य आहेत तरी देखील पांडवांच्या वनवासात कौरवांच्या पदरी राहून त्यांचे अन्न खाल्ल्यामुळे भीष्मास कौरवांचा पक्ष सोडता येईना व ते पांडवांचा नाश करण्यास सज्ज [झाले. ]
लॉर्ड लोथिअनच्या अध्यक्षतेखाली फाँचाइज कमिटीवर काम करीत असता आम्ही पंजाबात गेलो होतो. अस्पृश्य समाजातर्फे साक्षी देण्याकरिता काही सुशिक्षित गृहस्थ पंजाबात आहेत का अशी चौकशी करता कॉलेजात शिक्षण घेत असलेली काही मुलें मला आढळली. ती मुले आर्य समाजाने चालविलेल्या वसतिगृहात राहत असून त्या समाजाच्या खर्चानि त्यांचे शिक्षण चालू होते. त्या मुलांनी मला सांगितले की आर्य समाजाकडून आपल्यास असे स्पष्ट बजावण्यात आले होते की, समाज सांगेल त्याचप्रमाणे त्यांनी साक्ष न दिल्यास वसतिगृहातून त्यांची हकालपट्टी होईल व शिक्षणाकरिता त्यास मिळणारी मदत एकदम बंद