८-१२-१९३५ जो धर्म माणसांना माणूसकीने वागवीत नाही त्याला धर्म कसे म्हणावे ? - Page 479

७८
जो धर्म माणसांना माणुसकीने वागवित नाही
त्याला धर्म कसे म्हणावे ?

निर्भीडकारांच्या आयुष्यातील तो अत्यंत भाग्याचा दिवस म्हणजे रविवार ता. ८ डिसेंबर १९३५ हा होय. त्या दिवशी रात्री मुंबईच्या फोरस रोड जवळील जुनी ढोर चाळ, जयरामभाई स्ट्रीटवर एक अत्यंत महत्त्वाची सभा होणार असून त्या सभेत धर्मांतराच्या घोषणेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतराच्या विषयावर मुंबईतील पहिलेच महत्त्वाचे भाषण होणार असे जाहीर झाले होते. या भाषणामुळे त्या सभेला एक प्रकारची अपूर्वता आली होती हे न सांगताही चाणाक्ष वाचकांना समजण्यासारखे आहे. त्या सभेला हजर राहून आमचे विचार दहा हजार श्रोतृ समाजासमोर मांडण्याची संधी आम्हास लाभली हे आम्ही आमचे परम भाग्यच समजतो. या निर्भीडकारांच्या आयुष्यात जे काही थोडे फार भाग्याचे दिवस उगवले त्यात आम्ही गेल्या रविवारला अग्रपूजेचा मान देत आहोत, कारण ही सभा जशी महत्त्वाची होती, तशीच सुधारक स्पृश्य समाजातर्फे अस्पृश्यांच्या धर्मातराबाबत घोषणा करण्याची आम्हास लाभलेली सुसंधीही महद्भाग्याचीच

होती

गेल्या रविवारी रात्रीची सभा श्री. सोमवंशीय गुरूदत्त प्रासादिक भजन समाजाच्या विद्यमाने बत्तिसाव्या वार्षिक दत्तजयंत्युत्सवानिमित्त भरविण्यात आली होती. हा उत्सव गेली बत्तीस वर्षे अत्यंत थाटामाटाने साजरा होत असून त्या उत्सवास हजारो अस्पृश्य बंधु-भगिनींची चिकार गर्दी लोटत असते. या उत्सवाचे पुण्यात्मे संस्थापक, कै. माधवनाथ मोरे हे असून त्यांच्या हल्लीच्या व्यवस्थापक मंडळात श्री. बाळाजी सुडकाजी मोरे, शंकरराव आडेजाधव, माधवराव पारधे, गंगारामपंत मुकादम आणि रेवजीबुवा डोळस ही प्रमुख पुढारी मंडळी आहेत. या व्यवस्थापक मंडळाने यंदाचाही उत्सव अत्यंत थाटामाटाने साजरा केला हे त्यास अत्यंत भूषणावह होय. त्यांच्या उज्वल धर्मबुद्धिबद्दल त्यास व त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांस आम्ही स्पृश्य हिंदू समाजातर्फे मनःपूर्वक

धन्यवाद देतो.

यंदाचा दत्तजयंती उत्सव एकंदर चार दिवस साजरा झाला. पहिल्या दिवशी म्हणजे शनिवार ता. ७ रोजी श्रीयुत किसन देवीदास बोवा (कामाठीपुरा १३ वी गल्ली), रामजी रावजी बोरकर (ताडवाडी), रामजी धोंडूजी भालेराव (औचित्यवाडा), रामचंद्र सदूजी रणदिवे (बटाट्याची चाळ) या सुप्रसिद्ध धर्मभक्तांच्या व्यवस्थेखाली भजनकारांची संगीत भजने झाली,

निर्भीड : १५ डिसेंबर १९३५.