४३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आहे. मी धर्मांतराविषयी माझी मते निश्चित केलेली आहेत. मी धर्मातर करणारच आहे ; पण थोडा थांबलो आहे तो तुमचा बेत कळावा म्हणून ! तुम्ही सर्वच्या सर्व सात कोटी लोक धर्मांतर कराल तरच मला हवे आहे. एकाही माणसाने मागे राहाता कामा नये. थोडे थोडे फुटून परधर्मांत जाल तर तुमचे नुकसान होईल. सात कोटींनी गटाने धर्मातर केले पाहिजे. दहा हजार मुसलमान झाले, चार हजार खिस्ती झाले तर असल्या फाटाफुटीने अकल्याण होईल. तुम्ही काही थोडे लोक माझ्याबरोबर परधर्मांत आलात तर मला तुमचे हित करता येणार नाही. तुम्ही सर्व आलात तर मला तुमचे काही हित करता येईल. सर्वाचा एकच निश्चय व्हावयाचा म्हणजे त्याला वेळ हा लागणारच ! तेवढा वेळ मी थांबायला तयार आहे. पण ही वेळ मी तुम्हा अस्पृश्यांना दिलेली आहे, स्पृश्यांना नाही ! सारे मला विचारायला येतात, तुम्हाला विचारायला कोणी येत नसेल. मला बोलावे लागते. पण त्याचा अर्थ माझा धर्मांतराचा निश्चय बदलणार आहे असा नव्हे. माझा निश्चय पक्का झाला आहे. पण मला तुमचा बेत काय तो कळला पाहिजे. हिंदू धर्म हा धर्म नाही. . हा रोग आहे, महारोग आहे ! (आम्ही बसलो होतो त्या बाजूला वळून) हा रोग हिंदूंना झाला आहे, आम्हाला नव्हे ! त्याचा संसर्ग आम्हाला बाधतो आहे. एखाद्यास जर सांसर्गिक रोग झाला तर ज्याप्रमाणे त्याला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येते त्याप्रमाणे हिंदुंपासून आम्हाला अलिप्त राहिले पाहिजे. रोग हिंदुंना झाला आहे, आम्हाला नाही. आम्ही अस्पृश्यांनी काय पाप केले आहे ? काही नाही. पापे केली आहेत ती स्पृश्यांनी ; त्यांची फळे मात्र आम्हाला भोगावी लागतात म्हणून आम्हाला दूर गेले पाहिजे. हिंदुंना जर रोगापासून आपला बचाव करून घ्यावयाचा असेल तर त्यांनीही आमच्या मागून यावे. अस्पृश्यता नष्ट करण्याकरिता खटपट करा असे म्हणतात, पण ते शक्य नाही. हिंदू धर्म हा मुळी धर्मच राहिलेला नाही. तो धर्म आहे असे कोणीही मला सिद्ध करून द्यावे. हिंदू धर्म हे एक विष आहे. विषाचे अमृत होणे शक्य नाही. ज्या धर्मांतील लोक अस्पृश्य समाजातील माणसांना माणुसकीने वागवीत नाहीत त्याला धर्म कसे म्हणावे ? विषाचे अमृत करण्याची काही युक्ती कोणाला माहीत असेल तर ती मला त्याने सांगावी. विषाचे अमृत होणेच शक्य नाही. पदार्थ खारट झाला तर तो अळणी करता येईल, आंबट झाला तर तो गोड करता येईल, पण विषाचे अमृत करणे अशक्य आहे. मी स्वतः स्वयंपाक करण्यास शिकलो आहे. मला कोणाही भगिनीइतका चांगला स्वयंपाक करता येतो. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण काही धंदा न मिळाल्यास बावर्ची