८-१२-१९३५ जो धर्म माणसांना माणूसकीने वागवीत नाही त्याला धर्म कसे म्हणावे ? - Page 483

जो धर्म माणसांना माणुसकीने . . . . . धर्म कसे म्हणावे ४३९

तरी होता यावे, म्हणून मी स्वयंपाक करण्याचे काम शिकलो आहे. एखादा पदार्थ खारट झाला तर त्यातले मीठ कसे काढावे हे ज्या भगिनींना माहीत नसेल त्यांना मी त्याची युक्ती सांगून ठेवतो. खारट पदार्थ शिजत असताना त्यात एक कागदाचा तुकडा टाकून ठेवावा म्हणजे तो पदार्थ अळणी होतो (टाळ्या). सांगण्याचे तात्पर्य इतकेच की सर्व काही बदलता येईल पण विषाचे अमृत होणार नाही. मला परवाच गुजरातीतून एक पत्र आले आहे. त्यातील हकीगत सांगितली तर हिंदू धर्म हे विष आहे याविषयीची तुमच्या मनाला खात्री पटेल. गुजरातेत एका गावाला एक जैन विद्यार्थ्यांचे बोर्डिंग आहे. - तेथे वीस-एक मुले शिकत असून त्यांच्यावर एक वृद्ध जैन सुपरिटेंडेंट नेमण्यात आलेला आहे. त्या बोडिंगाच्या आवारात एक अस्पृश्य जातीचे जोडपे काम करीत असे. त्यांना तीन चार वर्षाचे एक मूल होते. ते पाठीवर बांधून कामाच्या वेळी बोर्डिगाकडे घेऊन जात. एके दिवशी त्या मुलाला आवारात खेळत ठेवून त्याचे आई-बाप कोठे तरी बाहेर कामावर गेले. इकडे मूल खेळता खेळता बोंडिंगाच्या दारासमोरील पाण्याच्या लहानशा हौदाजवळ गेले. हा हौद चार पाच फूट खोल आणि दोन अडीच फूट रुंद एवढाच होता. दुर्दैवाने ते मूल हौदावर चढले आणि त्याची झेप जाऊन ते पाण्यात पडले. ही गोष्ट बोरडिंगातल्या वीस मुलांनी व त्यांच्या वृद्ध शिक्षकाने पाहिली पण त्यांनी काही त्या मुलाला हौदाबाहेर काढले नाही. त्या मुलांनी ही बातमी मुलाच्या आई-बापास कळविली. बऱ्याच वेळाने आई-बाप आले वत्या मुलाला त्यांनी बाहेर काढले. नंतर आई-बापाने त्याला इस्पितळात नेले. डॉक्टरने मुलाला तपासले व सांगितले की हे मूल दोन तासापूर्वीच मेलेले आहे. आता प्रश्न असा आहे की, त्या वीस जैन मुलांनी आणि त्यांच्या वृद्ध शिक्षकाने त्या मुलाला हौदाबाहेर का काढले नाही ? त्याचे उत्तर हेच आहे की, ते मूल अस्पृश्य जातीत जन्माला आलेले होते म्हणून, असा हा हिंदूधर्म आहे. त्याच्यापासून माणुसकीच्या अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अस्पृश्यांना हिंदू समाजाकडून कधीही न्याय मिळणार नाही. हिंदू धर्म हा रक्तपीतीचा रोग आहे. त्याच्यापासून अस्पृश्यांना आपला बचाव करून घ्यावयाचा असेल तर त्यांना धर्मातर एवढाच उपाय आहे. नुकतीच नाशिक जिल्ह्यातील नादूर या गावी घडलेली हकीगत तुम्ही वाचलीच असेल. दोघा महारणी बायाजवळ दोन गवताच्या पेढ्या आढळल्या. धर्मांतराच्या घोषणेमुळे चिडलेल्या मराठ्यांनी त्या बायांवर मराठ्यांच्या शेतातून गवत कापून आणल्याचा आरोप ठेवला. त्या बायांनी पुष्कळ प्रकारे विनवून सांगितले, पण मराठयांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. शेवटी त्यांचा छळ करण्यात आला, पण एवढ्यानेही त्या मराठ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी महारांच्या शेतात आपली गुरे-ढोरे सोडून दिली व महारांच्या उभ्या पिकाची नासाडी केली. अस्पृश्यांना स्पृश्य समाजाकडून अशीच वागणूक मिळत असते.