८-१२-१९३५ जो धर्म माणसांना माणूसकीने वागवीत नाही त्याला धर्म कसे म्हणावे ? - Page 484

४४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

म्हणून म्हणतो की हिंदू धर्म हा नरक आहे. तुम्ही धर्मातराबाबत कोणता निश्चय ठरविता हे पाहण्यासाठी मी थांबलो आहे. मला तुमच्या पुढारीपणाची जरूरी नाही. कसलीही इतर अपेक्षा नाही. माझी उन्नती करून घेणे माझ्या हातात आहे. माझ्याबरोबर धर्मातर करावयाचे असेल तर सर्व मिळून या. येथे एक दोन महिन्यात प्रथम मुंबई इलाख्यातील महार लोकांची परिषद भरणार आहे. त्यांचा निश्‍चय ठरला म्हणजे इतर जातींच्या परिषदा भरविण्यात येतील. आणि शेवटी हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्यांची परिषद भरुन निर्णय करून घ्यावा लागेल. याला वेळ लागणारच. योग्य तितका वेळ मी तुम्हाला देत आहे. तेवढ्यात काय तो आपला निश्‍चय करा. धर्मांतर करावयाचे म्हणजे काय करावयाचे ते आजच सांगण्यात अर्थ नाही. ज्यात तुम्ही राहाता ते मकान कायमचेच सोडावयाचे असा एकदा तुमच्या सर्वाच्या मनाचा निश्चय झाला म्हणजे मग कोणत्या मार्गाने जावयाचे ते सांगू. तुम्ही हिंदू धर्मात राहाता कारण तुम्ही निर्बुद्ध आहात . तुम्हाला लाज नाही, शरम नाही, म्हणूनच तुम्हाला माणुसकीची जाणीव झालेली नाही. याचमुळे तुम्ही या धर्मात राहिला आहात. इतके बोलून मी भाषण संपवितो.

असे म्हणून डॉ. आंबेडकरांनी आपले भाषण एकाएकी संपविले आणि ते गंभीरपणे आपल्या जागेवर जाऊन बसले. भाषण संपविण्याच्या वेळी त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर व संतापाने लाल झालेला दिसत होता. ते इतके भावनावश झाले होते की, त्यांच्या तोंडून पुढील शब्द निघणेच शक्य नव्हते. त्यांनी एकाएकी भाषण संपविले खरे, पण श्रोत्यांच्या मनावर त्याचा परिणाम मात्र भयंकर झाला. त्यांची बोलण्याची पद्धत सरळ, साधी व सडेतोड होती. ते तिखट भाषेत श्रोत्यांची अंतःकरणे कापीत पुढे गेले. एका विशिष्ट पण मध्यम आवाजात त्यांनी सर्व भाषण केले. आवाजात चढउतार नाही की, अलंकारिक भाषेचा नटवेपणा नाही, त्यांची वाक्येही लहान व सुटसुटीत होती. हे भाषण झाल्यानंतर जास्त काही एक न बोलता सभा बरखास्त केली. अध्यक्षांनी समारोप न करण्यात एकप्रकारे डॉ. आंबेडकरांविषयीचा अत्यादर व्यक्त केला इतकेच नव्हे तर त्यांनी विशेष प्रकारचा मुत्सद्दीपणाही दाखविला. अध्यक्षांनी समारोप न केल्याने श्रोत्यांच्या मनावर झालेला परिणाम टिकण्यास अत्यंत मदत झाली. शेवटी फक्त हारतुरे समर्पणाचा समारंभ झाला. डॉ. आंबेडकर, डॉ. सोळंकी, श्री. देवराव नाईक यास व सर्व पुढारी मंडळीस पन्नासावर - पुष्पहार अर्पण करण्यात आले. हा समारंभ . आटोपल्यावर लोकांनी डॉ. आंबेडकरांच्या नावाचा जयजयकार केला व सभेचे काम संपले. इकडे डॉ. आंबेडकर वगैरे पुढारी मंडळी गर्दीतून मार्ग काढीत मोटारीकडे रवाना झाली.