७९
धर्मातराने सर्व अल्पसंख्यांकांचे कल्याण होईल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथील अस्पृश्यवर्गीय परिषदेत धर्मांतराची घोषणा केल्यापासून हिंदुस्थानात मोठी खळबळ उडून गेली व या घोषणेमुळे स्पृश्य हिंदूसमाज हादरून गेला आणि या त्यांच्या धर्मातराच्या घोषणेस हिंदू अस्पृश्य बांधवांकडून दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. या घोषणेस महाराष्ट्रातफे पाठिंबा देण्याकरिता गेल्या जानेवारी महिन्याच्या ता. ११ व १२ जानेवारी १९३६ रोजी पुणे येथे अहिल्याश्रमाच्या भव्य पटांगणात उभारलेल्या मंडपात अखिल महाराष्ट्रीय अस्पृश्य तरुण परिषद भरविण्यात आली. या परिषदेचे अध्यक्षस्थान मद्रासचे सुप्रसिद्ध पुढारी रा. सा. प्रो. शिवराज, बी. ए., बी. एल. यांना देण्यात आले होते. परिषदेच्या पूर्वी अध्यक्षांची प्रचंड मिरवणूक पुणे कॅम्प विभागातून काढल्यानंतर सायंकाळी ५-३० वाजता अधिवेशनास सुरवात झाली. परिषदेस दहा हजार स्त्रीपुरुष समुदाय हजर होता. यात काही थोडे स्पृश्य हिंदू, मुसलमान व शीख मंडळीही दिसत होती. हजर असलेल्या मंडळीत सर गोविंदराव माडगावकर, रा. सा. त्रिभुवन शेठ किराड, श्री. भाऊराव पाटील, श्री. शांताराम पोतनीस, मि. आश्रफ अल्ली, मीर मुनशी, भालदार, श्री. आर. बी. भागवत, डॉ. वि. म. SH अण्णासाहेब नवले, सरदार दरबारसिंग, ' सुभेदार घाटगे, सुभेदार धुत्रे, महाडचे श्री. सुरेंद्रनाथ टिपणीस, श्री. अ. वि. चित्रे, श्री. सीताराम लांडगे, अमृतसरचे सरदार गुरूमुखसिंग, स. तुळशीसिंग, स. दिवाणसिंग, स. नारायणसिंग, स. इंद्रसिंग, स. तेजसिंग, स. सुभेरसिग, वे. आग्रवाल, मि. एस. एस. जगताप, मि. जे. टी. आल्हार, मि. ससाने, श्री. तात्याबा शिंदे वगैरे. याशिवाय बाहेरगावचे बरेच प्रतिनिधी हजर
होते.
अस्पृश्यांचे मुख्य पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कार्यक्रमाच्या ठिकाणी थोडे उशिरा पोहचले. त्यामुळे सुरवातीला लोकांची निराशा झालेली दिसत होती, त्यामुळे मंडपाच्या मुख्य भागी अध्यक्षांच्या खुर्चीजवळच एका खुर्चीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुष्पहारमंडित फोटो ठेवण्यात आला होता.
जनता : ८ व १५ फेब्रुवारी १९३६.