२
उन्नतीच्या आड येणाऱयांचा निषेध
दिनांक २७ मार्च १९२० च्या ' मूकनायक ' मध्ये नागपूर येथे येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात हिंदुस्थानातील महार, मांग, चांभार, पारिया, पंचम वगैरे जातींनी आपल्यावरील बहिष्कार घालविण्याकरिता आणि शिक्षणविषयक सामाजिक व राजकीय बाबतीत आपली प्रगती करण्याकरिता एक परिषद भरविण्याचे ठरविले आहे असे जाहीर करण्यात आले. या परिषदेचे अध्यक्षस्थान श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार करवीर (कोल्हापूरचे राजेसाहेब) ह्यांनी स्वीकारल्याचे कबूल केले होते.
जाहीर झाल्याप्रमाणे भारतीय बहिष्कृत परिषदेचे अधिवेशन नागपूर येथे ३०, ३१ मे व १ जून १९२० रोजी भरविण्यात आले. अस्पृश्य समाजाच्या राजकीय ` हक्कांच्या मागण्यासंबंधीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली भारतीय स्तरावरील ही पहिलीच बहिष्कृत समाजाची परिषद. असल्यामुळे ऐतिहासिक महत्त्वाची होती. या परिषदेचे नियोजित अध्यक्ष होते कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, परिषदेचे स्वागताध्यक्ष होते गोंदियाचे बाबू कालीचरण नंदागवळी आणि सेक्रेटरी होते गणेश आकाजी गवई व किसन फागूजी बनसोडे. या परिषदेला मद्रास, मुंबई, खडकपूर, मध्यप्रांत व वऱ्हाड येथून ५०० प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर, सी. ना. शिवतरकर, शि. जा. कांबळे, कदम, गो. गो. काळे, ऐदाळे, भोसले वगैरे प्रतिनिधी मुंबईवरून आले होते. तसेच कोल्हापूर- वरून ब्राह्मणेतर चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते सर्वश्री रणदिवे, बाबुराव हैबतराव यादव, कोठारी, श्रीपतराव शिंदे, कांबळे, डिप्रेस्ड क्लास मिशनचे सुपरिन्टेन्डेन्ट श्री. बर्वे ही मंडळी आलेली होती. तसेच नागपूरच्या सुशिक्षित सुधारकांपैकी सर्वश्री पंडित सर गंगाधरराव चिटणीस, शंकरराव चिटणीस व हिंदू मिशनरी सोसायटीचे येथील अधिकारी डॉ. परांजपे आदि उपस्थित होते.
परिषदेचा मंडप स्टेशनपासून चार फर्लागावर जुन्या आर्सनल ग्राऊंडवर (कस्सुंरचंद पार्क) बराच विस्तीर्ण असा घालून चांगला श्रृंगारला होता. विजेच्या बत्त्यांचा झगझगाट होता. व्यासंपीठावर एका सिंहासनाची मांडणी केली होती. अस्पृश्य महिलासुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या.
विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास : एच. एल. कोसारे, पृ. ४४-४९.