४४६ ` डॉ. बाबासाहेब आंवेडकर लेखन आणि भाषणे
समाजाला महारांचे वर्चस्व नको आहे आणि त्यांची ही मागणी अगदी रास्त आहे. मला स्वतःला महार जातीचा विशेष अभिमान वाटत नाही. मी केवळ त्या जातीत जन्मलो आणि माझ्या शिक्षणाचा व ज्ञानाचा फायदा आपल्या अज्ञ बांधवांना द्यावा म्हणून त्या जातीत प्रथम कार्याला सुरवात केली.
महाराष्ट्रात तरी अस्पृश्य समाजात महारांची संख्या अधिक आहे. तेव्हा अल्पसंख्यांकांची जशी नेहमीच कुचंबणा होते, तशी आपल्या मांग व भंगी बंधुंची होत आहे, हे त्यांनी ध्यानी आणून अस्पृश्यांतील हा उच्च-नीच भाव एकदम नष्ट करावा. मांग व भंगी या समाजाला माझे असे आश्वासन आहे की, ज्यावेळी महार तुम्हास समानतेने वागविणार नाहीत त्यावेळी मी तुमचा आहे. -तुमच्या- वतीने तुमचे भांडण मी महारांशी भांडेन (टाळया).
धर्मांतराची जी अनेक कारणे आहेत त्यात हिंदू धर्मातील जातीभेद हे एक मुख्य आहे. स्पृश्य हिंदू आम्हाला नेहमी हिणवतात की, प्रथम अस्पृश्यात जातीभेद आहेत ते मोडा व मग आम्हाला जातीभेद मोडावयास सांगा पण त्यांना मला एवढेच सांगावयाचे आहे की, जोपर्यंत आम्ही तुमच्या धर्मात आहोत, तोपर्यंत आम्हास आमच्यातील जातीभेद मोडता येणार नाही. तुमच्या हिंदू धर्माच्या व जातिभेदाच्या पोलादी चौकटीत राहून आम्हास ती सुधारणा करता येणार नाही आणि म्हणूनच धर्मातरानंतर जात्युच्छेदनाचा प्रश्न सोपा होईल अशी माझी समजूत आहे. आता जर एखाद्या महारास मांगाची मुलगी कर म्हटले तर तो लगेच स्पृश्य तसे करीत नाहीत म्हणून तिकडे बोट दाखवील, पण आपण सर्वच अस्पृश्य स्पृश्यांच्या या भेदभावाच्या भोवन्यातून बाहेर पडून गेल्यावर त्यास तसे करता येणार नाही.
धर्मातराने खुद्द महारापेक्षा अल्पसंख्यांक अशा भंगी व मांग समाजाचे जास्त कल्याण होईल. ते सर्व महारांच्या एकाच पातळीवर येतील आणि म्हणून मांग अगर भंगी जातींनी या धर्मांतराच्या प्रश्नास जास्त जोराचा पाठिंबा देणे त्यांच्याच फायद्याचे आहे. जातीभेद नष्ट करणे हे स्वराज्य संपादनापेक्षाही जास्त पवित्र कर्तव्य आहे. सबंध हिंदुस्थानातील जातीभेद जेव्हा कधी नष्ट व्हायचा असेल तो होवो, पण अस्पृश्य समाजातील जातिभेद मला नष्ट करता आल्यास मी स्वतःला भाग्यवान पुरुष समजेन (प्रचंड टाळ्या).
तुम्ही आजपर्यंत मजविषयी जो विश्वास प्रगट केलात, त्याबद्दल मी मानव असल्यामुळे मला आनंद होत आहे, पण त्याबरोबरच माझ्या शिरावरील जबाबदारीचा बोजा वाढत चालल्याची जाणीवही मला होत आहे. तुम्हा सात कोटी लोकांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्या माझ्या हातून जर का थोडीही चूक झाली, तर केवढ्या मोठ्या समाजाच्या नुकसानीस मी कारणीभूत होईल याचा मला रात्रंदिवस विचार करावा लागत आहे. माझ्या या धर्मांतराच्या घोषणेला