११-२-१९३६ सर्वानी दृढनिश्चयाने आणि संघटितपणे कूच करावयाचे आहे - Page 493

सर्वांनी दृढनिश्चयाने, . . . . . करावयाचे आहे ४४९

पुढे पाऊल टाकण्याची वेळ येईल त्या वेळेस आपल्यातील अज्ञ, अशिक्षित किंवा भेकड माणसे पाठीमागे रेंगाळता कामा नयेत. म्हणून सर्वांनी दृढ निश्चयाने एकाच वेळी कूच करावयास लागावयाचे आहे.

आता आजच्या मुख्य कार्यासंबंधी बोलावयाचे म्हणजे तुम्ही तरुणांनी सेवा धर्माचे ध्येय पुढे ठेऊन ही जी संस्था काढली आहे त्या तुमच्या अनुकरणीय कार्याबद्दल मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. तुमच्यामध्ये असे पुष्कळ लोक आहेत की दुसऱ्यांनी हातभार लावल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही. या कार्यात तुम्ही एक गोष्ट कधीही विसरता कामा नये आणि ती ही, ' शील आणि शिक्षण ही जवळ असल्याशिवाय मनुष्याला या जगात काहीच साध्य करून घेता येणार नाही. ' दुसरी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, आज तुम्ही स्वातंत्र्य व स्वावलंबन मिळविण्याकरिता लढा चालविला आहे त्यात तुम्हास यशस्वी व्हावयाचे असेल तर तुम्ही बाहेरच्या माणसाच्या मदतीची अपेक्षा न करता परावलंबी जिण्यापासून अगदी अलिप्त राहिले पाहिजे. हे तुम्ही जर करणार नाही तर, ध्यानात ठेवा, तुम्ही परत गुलामगिरीच्या गर्तेत पडाल. ज्या स्पृश्य हिंदुंनी आजपर्यंत तुम्हाला दास्यत्वात खितपत ठेवले ते तुम्हाला आमिष दाखवून मदत करण्याकरिता एका पायावर तयार देखील होतील, पण जर तुम्ही या मोहाला बळी पडलात तर त्यांच्या पायातील तुम्ही घुंगरू बनाल व तुमच्या नशिबाची गुलामगिरी टळणार नाही. महाभारतातील गोष्टी तुम्ही ऐकल्या असतीलच. त्यातील एक कथा या प्रसंगी अत्यंत बोधप्रद होईल. मी ती शेकडो वेळा वाचली आहे. तुम्ही देखील ती वाचली असेल. कदाचित यापुढे तुम्हाला ती वाचावयास मिळणार नाही. कौरव-पांडवांच्या युद्धात तुम्हाला माहीत आहे की, भीष्म व द्रोण हे कौरवांच्या बाजूने लढले ; आणि न्याय व सत्य ही पांडवांच्या बाजूला आहेत याची त्यांना पूर्ण जाणीव असताही त्यांना कौरवांचा पक्ष सोडता येईना. आणिते का तर त्यांनी कौरवांचे नमक खाल्ले होते. म्हणून तुम्ही कोणाचेही ओशाळे होऊ नका.

शेवटी तुम्हाला एकच गोष्ट सांगावयाची आहे. निरनिराळया अनेक संस्था काढू नका. माझा असा अनुभव आहे की, निरनिराळया संस्था केवळ आपसात दुही माजविण्यास कारणीभूत होतात आणि शेवटी सर्वच विलयाला जातात. सबंध जिल्ह्याची मिळून एकच संघटित संस्था असू द्या व तिच्यामार्फत आपला योग्य मार्ग चोखाळून आपली सुधारणा घडवून आणा.