२९-२-१९३६ तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे आहे की स्वतंत्र माणसाप्रमाणे जगावयाचे आहे ? - Page 494

८१
तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे आहे की

स्वतंत्र माणसाप्रमाणे जगावयाचे आहे ?

कुलाबा जिल्हा उत्तर भाग व ठाणे जिल्हा दक्षिण भाग अस्पृश्यांची संयुक्‍त परिषदेची पूर्वतयारी करण्याकरिता श्री. गणपत महादेव जाधव उर्फ मडकेबुवा हे मुद्दामं १५-२० दिवस परिषदेच्या भागात प्रचाराकरता खेड्याखेड्यातून हिंडत होते. तसेच परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. रामकृष्ण गंगाराम भातनकर, (कुलाबा जिल्हा लोकल बोर्डाचे सभासद) यांनी पूर्वतयारी मोठ्या उत्साहाने व कसोशीने केली आणि या दोघांच्या श्रमाचे फळ त्यांना मिळाले व परिषदेचे अधिवेशन फेब्रुवारी ता. २९ व मार्च ता. १, १९३६ या दोन दिवशी अगदी यशस्वीरीतीने पार पडले.

परिषदेचे नियोजित अध्यक्ष अखिल हिंदुस्थानातील अस्पृश्य वर्गाचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारणार असल्यामुळे परिषदेच्या अधिवेशनास फारच महत्त्व आले होते. डॉ. बाबासाहेब हे शनिवार," ता. २८ फेब्रुवारी १९३६ रोजी मुंबईहून आपल्या सहकाऱ्यांबरोबर स्पेशल मोटारने सुमारे ४.३० वाजता निघाले. त्यांच्या समवेत मे. सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर, वयोवृद्ध श्री. संभाजी तुकाराम गायकवाड, सी. ना. शिंवतरकर, वनमाळी मास्तर, प्रि. मो. वा. दोंदे, बी. ए., कमलाकांत चित्रे, आर. डी. कवळी, बी.ए., एलएल.बी, वकील, रेवजी बुवा डोळस, दिवाकर पगारे, धुंडिराम गायकवाड, मडकेबुवा जाधव वगैरे मंडळी होती. |

पनवेलनजीक तळोजे येथील मंडळींनी मुद्दाम मंडप उभारून डॉ. बाबासाहेबांचे स्वागत करण्याकरिता व्यवस्था केली होती. स्वागताध्यक्ष श्री. रामकृष्णराव भातनकर हे तेथे सामोरे आले होते. स्थानिक मंडळींनी डॉ. बाबासाहेबांस हारतुरे अर्पण केल्यावर मोटार पुढे चालू लागली. पनवेल गावात शिरल्यावर मुसलमान व्यायाम शाळा व अंजुमन इस्लाम या संस्थेतर्फे हार अर्पण करण्यात आले. नंतर सिद्दिकबुड्डा शेट या मुसलमान गृहस्थांनी बाबासाहेबांस पुष्पहार अर्पण केले. नंतर चांभार समाजातील श्री. महादेव लक्ष्मण व महादेव मारुती या गृहस्थांनी त्यांचा सन्मान केला. अशारीतीने प्रेमादराने दिलेल्या पुष्पहाराचा स्वीकार करीत संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब पनवेल

जनता : ७ मार्च १९३६.

* हा दिवस शुक्रवार असावयास हवा-संपादक.