तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे . . . . माणसाप्रमाणे जगावयाचे आहे ? ४५१
येथील सुभेदार वाड्यात दाखल झाले. या ठिकाणी त्यांच्या सोईकरिता एक खास मंडपं उभारण्यात आला होता. या मंडपात डॉ. बाबासाहेबांचे
आगमन झाल्याबरोबर महिलांनी वात्सल्यपूर्ण भावाने त्यांचे स्वागत केले.
सौ. लक्ष्मीबाई अर्जुन शिरावले यांनी महिलांतर्फे त्यास कुंकुम तिलक व अक्षता लावून त्यांच्यावरून आरती ओवाळली. हा सुमंगल विधी पाहून प्रेक्षकांच्या हृदयात आनंदलहरी उचंबळू लागल्या व युवकांचा उत्साह द्विगुणित झाला व त्यांच्या मुखातून बाबासाहेबांच्या जयघोषाची वचने स्फूर्तीने बाहेर पडली. नंतर पाहुणे मंडळींचे चहापाणी झाल्यावर ठिकठिकाणहून आलेले प्रतिनिधी व इतर कार्यकर्ते यांच्या भेटी सुरू झाल्या. प्रत्येक ठिकाणची मंडळी आपली दु:खे निवेदन करीत होती. त्यात प्रामुख्याने भोर संस्थानातील सुधागड तालुक्यातील लोक होते.
एका गावच्या महारवाड्यावर स्पृश्य हिंदूंच्या अनेकविध कारवायांमुळे सध्या चालू असलेल्या छळासंबंधी माहिती गोळा करावी व तेथील लोकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून श्री. बी. टी. तांबे यांची डॉ. बाबासाहेबांनी खास रवानगी केली होती. श्री. तांबे हे एक उत्साही व शिपायी बाण्याचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या येण्याने लोकांच्या मनातील भीती नाहीशी होऊन ते संकटास तोंड देण्यास तयार झाले. या गावच्या काही लोकांना बरोबर घेऊन बाबासाहेबांचा सल्ला घेण्याकरता ते पनवेल येथे आले होते.
शनिवारी विषयनियामक कमिटीची बैठक होऊन दुसऱ्या दिबसाच्या अधिवेशनाकरिता नऊ ठराव मुक्रर करण्यात आले. गावोगावची मंडळी शुक्रवार पासून येत होती व शनिवारी रात्री लोकसमुदाय सुमारे २,००० वर जमला होता. पनवेल व नजीकच्या प्रदेशात अस्पृश्य लोकसंख्या अगदी थोडी आहे. गावात एखाद दुसरे घर. या मानाने दोन हजार ही संख्या फार मोठीच होय. या लोकसमुदायाचे मनोरंजन करण्याकरिता पोवाडे व जलसा यांची योजना करण्यात आली होती. श्री. घेगडे यांचा नाशिक सत्याग्रहावरील हृदयस्पर्शी पोवाडा श्री. द्वारकाकांत शेजवळ यांनी आपल्या सुस्वर स्फूर्तीदायक आवाजात गायिला. लोकशिक्षण हेच ध्येय पुढे ठेऊन ज्या काही जलसा मंडळींनी आपली समाज सेवा अव्याहत व परिश्रमपूर्वक चालविली आहे असे दोन फड मुंबईहून मुद्दाम बोलावून आणले होते. ते म्हणजे दलितोद्धारक सुस्वर जलसा व नाशिक जिल्हा युवक संघ जलसा. या दोन मंडळींनी रात्रभर आपली कामगिरी आळीपाळीने चालू ठेवली होती.
दुसरे दिवशी सकाळी ९-३० वाजता जमलेल्या मंडळींची मिरवणूक काढण्यात आली. आरंभी श्री. वसंतराव भातनकर यांनी लोकांना शिस्तीचे महत्त्व समजावून दिले व मिरवणूक शांततेने पार पाडण्याची विनंती केली.