२९-२-१९३६ तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे आहे की स्वतंत्र माणसाप्रमाणे जगावयाचे आहे ? - Page 498

४५४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

तर तुमच्या घरात मातीची मडकी, अशी तुमची दैनावस्था ! याचे पहिले कारण त्यांना जी उपजीविकेची साधने खुली आहेत ती तुम्हाला खुली नाहीत. तुम्हाला आज डेप्युटी कलेक्टर, मामलेदार किंवा पोलीस ऑफिसर वगैरे बड्या पगाराच्या जागा मिळत नाहीत. का? तर तुमच्यामध्ये सुशिक्षित तरुण नाहीत म्हणून. असे जरी गृहीत धरले तरी या अंमलदारांपेक्षा कमी दर्जाच्या अनेक नोकऱ्या आहेत. त्या देखील तुम्हास मिळत नाहीत. तेथेही तुम्हास मज्जाव आहे. साधी पोलिसाची नोकरी घ्या. ती तुम्हास का मिळत नाही? ह्या जागेची जबाबदारी पार पाडण्यास काही फार शिक्षण लागत नाही. २-३ इयत्ता शिकणाऱ्या स्पृश्य समाजातील कोणाही माणसास ती नोकरी मिळू शकते , पण तुम्हास ती जागा मिळत नाही. तुमच्यात प्रामाणिकपणाचा किंवा सचोटीचा अभाव आहे असे म्हणावे तर आज लाखो रुपयांचा वसूल महाराकडून केला जात आहे. या वसुलाची ने-आण महारच आज कित्येक वर्षे करीत आले आहेत. पण महाराने या वसुलात अफरातफर करून दगलबाजी केली आहे, असे कोणाच्याही ऐकिवात आले का ? याच्याउलट मामलेदारी सारख्या वरिष्ठ दर्जाच्या नोकऱ्या करणाऱ्या स्पृश्य समाजातील लोकांकडून अनेक दगलबाज्या झाल्या आहेत. त्याचे दाखले दाखविता येतील. हे झाले नोकऱ्यासंबंधी. इतर लहानसहान धंदे घ्या. तुम्ही दुधाचा, दह्याचा किंवा लोणी विकण्याचा धंदा करू म्हणाल तर तुमचे दूध कोणी घेणार नाही व तुमच्या हातच्या लोण्याने गिर्‍्हाईकांचा धर्म बुडेल. तुम्ही भाजी विकण्याचा धंदा करावयास जा. तरी तीच गत. तुम्हाला डोके वर करावयास म्हणून कोठेच जागा नाही. अशी तुमची आज शोचनीय परिस्थिती आहे. तुम्ही या स्थितीचा कधी विचार केला आहे का? असा मी तुम्हास प्रश्‍न विचारतो. इतर लोक आपल्या मुलाबाळांची नीट निगा राखून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करतात व त्यामुळे ते आपली स्थिती सुधारू शकतात. तुम्हाला तसे का करता येत नाही. तुमचा सर्व बाजूनी कोंडमारा होतो. या प्रश्‍नांचा तुम्ही आज विचार करावयास पाहिजे. तुमच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा दूर करता येतील

हे तुम्ही पाहिले पाहिजे. तुम्हास मला असे विचारावेसे वाटते की, तुम्हास आपली स्थिती सुधारावयाची आहे की नाही ? आजपर्यंत तुम्ही या चिखलात लोळत पडला तसेच तुम्हास राहावयाचे आहे का ? ज्या ठिकाणी पायातील जोड्याइतकी तुमची किंमत नाही त्याच ठिकाणी तुम्हास कुजत राहावयाचे आहे का ? थोडक्यात सांगावयाचे म्हणजे तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे आहे की स्वतंत्र माणसाप्रमाणे जगावयाचे आहे? याचा आज तुम्हाला विचार करावयाचा आहे. तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येतील हे तुम्हास पाहावयाचे आहे.