२९-२-१९३६ तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे आहे की स्वतंत्र माणसाप्रमाणे जगावयाचे आहे ? - Page 499

तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे . . . . माणसाप्रमाणे जगावयाचे आहे ? ४५५

प्रामुख्याने आज तुमच्यापुढे तीन अडचणी आहेत, पहिली, तुमचे दारिद्र्य. दुसरी, तुमची असहाय्यता. तिसरी, तुमचे मनोदौर्बल्य. मनाचा कमकुवतपणा. तुम्ही सर्वजण दारिक्र्याने गांजून गेला आहा आणि त्यामुळे परावलंबी बनला आहात. स्वतंत्रवृत्तीने तुम्हास काहीच करता येत नाही. तुम्ही साध्या माणुसकीकरिता झगडावयास लागला तर स्पृश्य लोकांकडून तुम्हाला जोराचा विरोध होतो आणि तुमचे जीवित सर्वस्वी त्यांवरच अवलंबून असल्यामुळे तुमच्या लढ्यापासून परावृत्त करण्याकरता ते तुम्हास हरएक प्रकारे नाडतात. त्यांनी भाकरीचा तुकडा दिला तर तुम्हास पोटास अन्न मिळणार. म्हणून हे परावलंबी जिणे नाहीसे करण्याच्या उद्योगास तुम्हास लागले पाहिजे. .

दुसरी गोष्ट म्हणजे तुमची असहाय्य स्थिती. तुम्हास कोणाचे सहाय्य नाही. मित्र म्हणून तुमच्या पाठीमागे उभे राहण्यास आज कोणीच तयार नाही. तुमच्यात व गावकऱ्यात तंटा उपस्थित झाल्यास तुमच्या मदतीस कोणीच धावून येत नाही. या देशात हिंदू समाजाशिवाय मुसलमान, खिस्ती व शीख असे समाज आहेत, पण मुसलमान किंवा खिस्ती तुमच्या मदतीस धाऊन येत नाहीत. ते का धावून येत नाहीत याचा तुम्ही नीट विचार करा. ज्या धर्मात |

आपण जन्मास आलो , ज्या धर्माची तत्त्वे आपण पाळतो व ज्या धर्माला आपण

आपला म्हणून म्हणतो तोच आपल्याला आज गांजीत आहे. त्याची गांजणूक आपण असहाय्य स्थितीत किती दिवस सहन करणार ? तुम्हाला मी विचारतो की, कोणाचीही मदत न घेता तुम्ही हिंदुंच्या लढ्यात कधी तरी यशस्वी होऊ शकाल का ? ज्यांच्यावर तुम्ही जगता ते तुम्हाला कधीतरी माणुसकीचे हक्क देतील अशी आशा बाळगण्याचे तुम्हास कारण नाही. मी तुम्हास खात्रीपूर्वक असे सांगतो की हिंदुंपासून तुमचा कधीही फायदा होणार नाही. मुलाच्या प्रत्यक्ष बापाने त्यास विहिरीत ढकलून दिल्यावर त्यास हात देऊन बाहेर काढणारा मनुष्य त्या मुलाचा मित्र की जीव घेण्यास प्रवृत्त झालेला बाप त्याचा मित्र ? तेव्हा अशा

प्रकारे हात देणारा मित्र तुम्हास शोधून काढावयाचा आहे.

आज मुसलमानांच्या वाटेस हिंदू का जात नाहीत ? ते त्यांच्या धर्माचा द्वेष

करतात, निंदा करतात पण गावातील दोन मुसलमानांच्या घरातील पोरास हात लावण्याची : हिंदुंची ताकद नाही. याचे कारण काय? या मुसलमानाच्या पोरास जर हात लावला तर हिंदुंना माहीत आहे की, हिंदुस्थानातील सर्व मुसलमान समाज त्याचे मदतीस धावत येईल व हिंदुंचा समाचार घेईल. पण हिंदु लोक तुम्हास गांजतात याचे कारण हेच की, तुमच्या मदतीस आज कोणीच धावून येत

नाही.