२९-२-१९३६ तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे आहे की स्वतंत्र माणसाप्रमाणे जगावयाचे आहे ? - Page 500

४५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पुष्कळ लोक तुम्हाला सांगतात की, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे रहा , परंतु ज्याचे दोनही पाय कापले आहेत तो उभा कसा राहणार ? तुम्ही कोणाचा तरी हात धरूनच उभे राहिले पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही सामर्थ्यवान बनाल. तुमच्या आजच्या असहाय्य परिस्थितीत जो तुम्हाला हात देईल तोच तुमचा खरा मित्र व वाली आणि म्हणून मी म्हणतो की, या करताच तुम्हाला धर्म बदलणे प्राप्त आहे. माणसाला धर्म प्रिय नाही. माणसाला माणुसकी प्रिय आहे.

कातकऱ्यासारखी अत्यंत मागासलेली जात ; पण तिलादेखील हिंदू धर्मात माणुसकी आहे. त्यांना स्पृश्यांच्या घरात जाता येते , पण तुम्हाला मात्र दारात देखील मज्जाव. तुमच्या हातचे दूध देखील घ्यावयास कोणी तयार नाही. नोकऱ्या करून किंवा इतर धंदे करून आपली उन्नती करून घेण्याच्या जेवढ्या म्हणून वाटा आहेत त्या सर्व तुम्हाला बंद आहेत. मुसलमान किंवा खिस्ती या धर्मातील लोक ज्या नोकऱ्या करतात त्या तुम्ही करू म्हटल्यास तुम्हास मात्र हिंदुंचा विरोध , म्हणून तुम्हाला मी पुन्हा सांगतो की, या हिंदू धर्मात राहून तुम्हाला आपली उन्नती करून घेणे शक्य नाही. तुम्ही हिंदू आहात म्हणूनच तुमची ही कुचंबणूक. तुम्ही मुसलमान असता, खिस्ती असता किंवा शीख असता तर या सर्व वाटा तुम्हास खुल्या असत्या व तुम्ही काही अंशी आपली आर्थिक सुधारणा करू शकला असता, पण जोपर्यंत तुम्ही हिंदू आहात तोपर्यंत जाचणुकीची ही पकड व त्यांचे वर्चस्वही कधीच दूर होणार नाहीत आणि यामुळे तुम्ही जिवंत नरकात खितपत पडला आहात. म्हणून तुम्ही या परिस्थितीचा नीट विचार करा. तुम्ही या आत्मघातकी धर्माला किती दिवस कवटाळून बसणार ? मेल्यानंतर तुम्हाला स्वर्ग पाहिजे की जिवंतपणी स्वर्गीय सुख तुम्हाला हवे ? मला तर याच जन्मी मोक्ष म्हणजे माणुसकी पाहिजे. दुसऱ्या जन्माशी किंवा काल्पनिक स्वर्गाशी मला काही कर्तव्य नाही. तिसरी गोष्ट अशी की, या हिंदू धर्माच्या खुळचट शिकवणुकीने तुमची मने मारली गेली आहेत. ज्याप्रमाणे सर्प पाहिल्याबरोबर एखादा मनुष्य गर्भगळीत होतो आणि त्याच्या नाड्या आखडतात, त्याचप्रमाणे तुमची आज स्थिती आहे. तुम्हाला असे वाटते की. आपण अगदी नीच आहो. हलके आहो. तुम्हाला हिंदू धर्म अतिशूद्र मानतो आणि तुम्ही आपल्या स्वतःला शूद्र मानता. त्यामुळे रस्त्याने चालताना देखील तुम्ही स्पृश्यांजवळून न जाता बाजूस होता. याचे कारण तुमचे मन मेलेले आहे. तुमचा स्वाभिमान निजलेला आहे. तुम्हाला आपण माणूस आहो असे वाटत नाही. त्यामुळे आपल्यावर जुलूम करणाऱ्या हिंदुंबरोबर झगडा करणे हा विचार तुम्हाला शिवत नाही. तुम्हाला मी निक्षून सांगतो की, तुम्ही जोपर्यंत हिंदू धर्माच्या चौकटीत आहात, जोपर्यंत तुमच्या हातापायात या बेड्या आहेत, जोपर्यंत तुमच्या मनावर या धर्मातील शिकवणुकीचा पगडा आहे, तोपर्यंत तुम्ही अगदी कुचकामीच राहणार.