२९-२-१९३६ तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे आहे की स्वतंत्र माणसाप्रमाणे जगावयाचे आहे ? - Page 501

तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे . . . . माणसाप्रमाणे जगावयाचे आहे ? ४५७

तुम्ही सर्वजन शेतकरी आहात. झाडे कोणत्या परिस्थितीत फोफावतात हे तुम्ही चांगले जाणता. तुम्हाला माहीत आहे की, एका झाडाच्या सावलीखाली दुसरे झाड जगत नाही व जगले तर खुरटे झाल्याशिवाय राहत नाही. आंब्याचे कलम लावावयाचे झाले तर एकएका कलमामध्ये १५-२० फुटांचे अंतर ठेवावे लागते. तरच त्या कलमांचा चांगला मोहोर फुटून गोड फळे येतात. याचे कारण काय ? मोठ्या झाडाच्या छायेखाली लहान झाडाला पुरेसा उजेड मिळत नाही. त्यावर सूर्याचा पूर्ण प्रकाश पडत नाही. इतर पोषक द्रव्येही त्यास पुरेशी मिळत नाहीत. या लहान झाडाप्रमाणेच तुमची गत झालेली आहे. तुम्ही हिंदू लोकांच्या छायेखाली राहिल्यामुळे तुमची वाढ झाली नाही. तुम्ही खुरट्या झाडाप्रमाणे झाला आहात. सद्गृहस्थहो, इतके दिवस तुम्ही झोपलेले होता. इतर लोकांनी या जगात काय लुटालूट केली यांचा आता आपण विचार केला पाहिजे. |

मी सांगितलेल्या तीन अडचणी दूर करण्याचा तुम्ही जर मनापासून प्रयत्न केलात तर तुमची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. आता पहिली अडचण म्हणजे तुमचे ' दारिद्र्य. ' हे दारिद्र्य घालविणे तुमच्या हाती नाही. पण, आपण दोघांनीही ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या बाबतीत .. तुमच्यापेक्षा माझ्यावर अधिक जबाबदारी आहे. मी व माझे इतर सहकारी यांचेवर ती जबाबदारी आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याकरता राजकीय हक्क आपल्याला मिळविले पाहिजेत. आज तुम्हाला कायदेमंडळात १५ जागा मिळाल्या आहेत. त्या जागांवर जाणाऱ्या प्रतिनिधींवर हरएक प्रकारे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी आहे. तुम्ही मात्र आपल्या स्थितीची पूर्ण जाणीव देऊन या तुमच्या म्होरक्यांना आपले कर्तव्य पार पाडण्यास भाग पाडले पाहिजे.

दुसरी व तिसरी अडचण म्हणजे तुमची ' असहाय्यता ' व तुमच्या ' मनाचा कमकुवतपणा '. हा दूर करणे मात्र सर्वस्वी तुमच्या हातात आहे. मी माझे कर्तव्य म्हणून ती अडचण कशी दूर करता येईल ते सांगेन. त्याप्रमाणे वागणे न वागणे हे तुमच्या हातात आहे. माझ्या मताप्रमाणे या दोनही अडचणी तुम्ही हिंदू धर्म सोडल्याने दूर होणाऱ्या आहेत. मी तुम्हाला सांगितले आहे की, तुमची असहाय्यता दूर करण्याकरिता तुम्ही दुसऱ्या धर्मातील समाजास मित्र करावयास पाहिजे. तसेच तुमचे मनोदौर्बल्य नाहिसे करण्याकरिता तुम्हाला दुसऱ्या धर्माच्या शिकवणुकीची कास धरल्याशिवाय गत्यंतर नाही, थोडक्यात सांगावयाचे म्हणजे या दोनही अडचणींवर तोडगा म्हणजे ' धर्मांतर ' ते करण्यास तुम्ही आता तयार झाले पाहिजे. . केव्हा धर्मातर करावयाचे, कोणत्या धर्मात जावयाचे हे मी योग्य वेळी सांगेन. माझे म्हणणे तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझ्या