२९-२-१९३६ तुम्हाला गुलामाप्रमाणे राहावयाचे आहे की स्वतंत्र माणसाप्रमाणे जगावयाचे आहे ? - Page 502

४५८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मागे या. नसेल तर खुशाल याच धर्मात राहा व खितपत पड़ा. ज्याअर्थी मी तुमच्या जातीत जन्माला आलो आहे त्याअर्थी माझे कर्तव्य म्हणून हे मी तुम्हाला सांगत आहे. तुमच्या बऱ्यावाईटाची जबाबदारी जर तुम्ही माझेवर टाकीत असाल तर मी सांगेन तसे वागण्यास तुम्ही तयार झाले पाहिजे व मी जिकडे जाईन तिकडे माझ्यामागे आले पाहिजे.

शेवटी तुम्हास माझे असे सांगणे आहे की, हा प्रसंग फार आणीबाणीचा आहे. आपण काय करावयाचे हे आज निश्चित केले पाहिजे. ५-१० वर्षांची मुदत तुम्हा सर्वास दिली आहे. त्याचे कारण एवढेच की, हा प्रश्‍न फार मोठा आहे, म्हणून त्याची वासलात लागणे सोपे नाही. तुमच्यापैकी निम्मे अर्धेच लोक जर धर्मांतर करावयास तयार झाले तर आपला फायदा होणार नाही. सर्व जणांनीच ते केले पाहिजे आणि त्या करताच ही ५-१० वर्षाची मुदत दिली आहे. या अवधीत तुमच्या मनावर बसलेला हा हिंदू धर्माचा पगडा दूर केला पाहिजे. एक गोष्ट ध्यानात ठेवा. ज्या वेळेस मला वाटेल की, तुम्ही धर्मातर करावयास तयार नाही त्या वेळेस असे समजा की, तुमची व माझी फारकत झाली. मी मात्र या कुचकामी व निरुपयोगी धर्मातून जाणार हे खास.