४६२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
करण्यास तयार आहोत असे त्याने सांगितले. संपातून एक टांगेवाला फुटल्यावर दुसरे ३ भंडारी जातीचे टांगेवालेही संपातून बाहेर पडून भाडे करण्यास तयार झाले. अशारीतीने चार टांग्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व थोडीशी मंडळी वेढीस रवाना झाली. आपण अस्पृश्य म्हणून आज आपणाशी या टांगेवाल्यांनी अशी वागणूक केली हे पाहून हिंदू धर्मातल्या आपल्या स्थितीबद्दल अस्पृश्य मंडळींना खेद वाटल्याखेरीज राहिला नाही.
शेवटी १२ वाजता सर्व मंडळी वेढी येथील परिषदेच्या मंडपापाशी आली. परिषदेकरता प्रशस्त मंडप उभारला होता. मंडपावर ताल वृक्षाच्या झावळ्या पसरल्या होत्या. मंडप सर्व बाजूंनी शुंगारला होता. परिषदेच्या मंडपात बाबासाहेब आंबेडकर येताच त्यांचे नावाचा जयघोष झाला. परिषदेसाठी ठाणे जिल्ह्यातील वसई येथील श्री. विष्णूपंत दांडेकर वकील, बोर्डीचे श्री. मुकुंदराव आनंदराव सावे, वेढी येथील नथोबा त्रिबकराव म्हात्रे, विरारचे एच. जी. वर्तक, श्री. खंडुभाई शहा, देवमास्तर व वेढी गावची इतर स्पृश्य मंडळी हजर होती व अस्पृश्य समुदाय ३-४ हजारावर हजर होता.
परिषदेच्या प्रारंभी ईशस्तवन झाले. त्यानंतर परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. शिवराम गोपाळ जाधव यांचे स्वागतपर भाषण झाले. त्यांचे भाषण झाल्यावर परिषदेचे नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. ते म्हणाले |
स्वागताध्यक्ष, प्रिय भगिनींनो व बंधुजनहो,
आजच्या या सभेला एक प्रकारचे अपूर्व स्वरूप प्राप्त झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. ज्या दिवसापासून मी सार्वजनिक कार्यात भाग घेऊ लागलो तेव्हापासून या भागात परिषद झाली नव्हती. १६ वर्षापूर्वी या भागातील टेंभुर्णी गावी परिषद झाली, त्यानंतर आज परिषद भरत आहे. या जिल्ह्यातील लोक आज इतके वर्षांनी येथे एकत्र जमत आहेत, ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे.
ही परिषद घडवून आणण्यासाठी या जिल्ह्याचे पुढारी श्री. शिवराम गोपाळ जाधव यांनी फार परिश्रम घेतले, कष्ट व मेहनत केली याबद्दल मी श्री. जाधव यांचे प्रथम अभिनंदन करून आभार मानतो.
सद्गृहस्थहो, पाल्हाळीक भाषण करून तुमचा वेळ मी घेणार नाही, परंतु मी दोन मुद्यांसंबंधी सांगतो. पहिला मुद्दा धर्मांतराचा. यासंबंधी काही लोक म्हणतात की, तुम्ही धर्मांतर करून काय साधणार आहात ? त्याचे उत्तर अनेक तऱ्हेने देता येईल, पण मी साध्या शब्दात त्याचे उत्तर देतो. धर्मांतराचा प्रश्न अत्यंत गहन व तत्त्वज्ञानाचा आहे. त्याची तुमच्या मनाला व बुद्धीला पटेल अशारीतीने चर्चा करणे जरूर आहे.