८७
ज्या धर्मात समता, प्रेम व आपुलकी नाही
तो धर्म, धर्म नव्हे
सोमवार, ता. ४ मे १९३६ हा दिवस अमरावतीकर अस्पृश्य बांधवांना सुवर्णमय दिवस वाटला, या दिवशी अस्पृश्य समाजाचे सर्वश्रेष्ठ पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर येणार हे ऐकून रेस्ट हाऊस पासून ते नेकोलेट पार्कपर्यत सर्व रस्ता रंगीत लतापताकांनी सुशोभित केला होता. ऊनतहानेची पर्वा न करता हजारो अस्पृश्य बंधुभगिनी स्टेशनवर डॉक्टरसाहेबांच्या स्वागतार्थ हजर होत्या. डॉ. बाबासाहेबांची स्टेशनपासून रेस्ट हाऊसपर्यंत बँडच्या सुस्वर वाद्यात व त्यांच्या नावाच्या जयजयकारात मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सहा सात वाजता नागपूर कॅम्प म्युनिसीपालिटीचे सेक्रेटरी श्री. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा झाली. प्रथम स्वागतपर पदे म्हणण्यात आली. नंतर स्वागताध्यक्ष श्री. एस. जी. नाईक, एम. एल. सी. यांच्या हस्ते अमरावती जिल्ह्यातील निरनिराळ्या संस्थेतर्फे जवळ जवळ ७५ हारतुरे डॉक्टर बाबासाहेबांना अर्पण करण्यात आले. स्वागताध्यक्षांच्या विनंतीप्रमाणे डॉ. आंबेडकरसाहेब भाषण करावयास उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. डॉ. बाबासाहेबांची प्रवासात प्रकृती बिघडली होती व त्यांचा घसा धरला होता. तरीपण त्यांनी त्याच स्थितीत भाषण केले. ते आपल्या भाषणात म्हणाले, |
मी अमरावतीस आज सात-आठ वर्षांनी येत आहे. मागे येथे अंबादेवीच्या सत्याग्रहाकरिता आलो होतो. त्यावेळी माझ्या अस्पृश्य बांधवांची सत्याग्रह करण्याची काहीच तयारी नव्हती. सत्याग्रहाने तुरूगवासात जाण्यास फक्त सहा माणसे तयार झाली होती. परंतु ती परिस्थिती आज पालटलेली पाहून मला आनंद होत आहे. येथे येण्यापूर्वी मला महात्माजींनी भेट घेण्यास वर्ध्यास बोलाविले होते. तेथे मी गेलो असताना श्री. जमनालाल बजाज यांनी जे आपल्या मालकीचे श्री. लक्ष्मीनारायणाचे देऊळ अस्पृश्यांकरिता खुले केले आहे ते मला पाहाण्याकरिता नेले होते. मी देवळात प्रवेश केला व देवळाच्या बाहेर येतो तर ती माझी अस्पृश्यता जशीच्या तशीच. कारण त्या देवळाकरिता लागणारे पाणी व फुले ही सुद्धा आम्हाला मिळू शकत नाहीत, तर मग आमची देवळात जाऊन
जनता : १६ मे १९३६.