४७६ डॉ. वावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
अस्पृश्यता कशी निघू शकेल ? असो. आम्हाला पूर्वी देवळावर सत्याग्रह करण्यत जितका आनंद वाटत होता तितकाच आता तिरस्कार वाटत आहे. जेव्हा म. गांधीजींनी स्वराज्याचा प्रश्न हाती घेतला तेव्हाच आम्ही त्यांना अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका असे बजाविले. परंतु अस्पृश्यतेचा प्रश्न हा स्वराज्यातले एक अंग आहे, असे सांगून ते स्वस्थ राहिले. आम्ही धर्मांतराची घोषणा केल्याबरोबर हिंदू लोकांना इतका बाऊ वाटण्याचे कारण काय हेच आम्हाला समजत नाही. हिंदू धर्म जर आम्हाला हिंदू म्हणवून घेण्यास तयार नाही तर आम्ही देखील स्वतःला हिंदू म्हणवून का घ्यावे ? ज्या धर्मात समता, प्रेम व आपुलकीची भावना नाही त्या धर्माला मी धर्म म्हणावयास तयार नाही. दोन हजार वर्षांपूर्वी आमचे पूर्वज अज्ञानी होते. त्यांना कोणत्याही प्रकारची विद्या संपादन करण्याची व शस्त्र हाती धरण्याची परवानगी नव्हती. म्हणून त्यांना कोणतेही नवीन कार्य करण्याचे धैर्य नव्हते. अज्ञानाने त्यांची मने मारून दुबळी केली होती. चार वर्णाच्या चौकटीत हिंदू धर्माला बसवून ठेविला आहे. या वर्णव्यवस्थेमुळे आम्हाला आमची लायकी ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ अमली तरी गुलामगिरीची कामे आम्हाकडे देण्यात आली. या गुलामगिरीमुळेच आपले पूर्वज स्वतःचा अभिमान साफ विसरून गेले. पण आज परिस्थितीत पालट झाला आहे. त्या स्थितीनुसार आम्हाला हिंदू धर्माच्या अनुदारपणाच्या चौकटीत राहता येत नाही. म्हणून ही धर्मांतराची घोषणा करणे भाग पडले आहे.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हारतुरे अर्पण करून त्यांचे आभार मानण्यात आले व सभा त्यांच्या जयघोषात बरखास्त झाली.