१७-५-१९३६ आपल्या मातीमोल आयुष्याला सोन्याचे दिवस प्राप्त होण्यासाठीच धर्मातराची आवश्यकता आहे - Page 522

४७८ डॉ. “ws वाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे

का करावे याची कारणे माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या अनेक प्रसंगावरून तुम्हाला सहज समजू शकतील. माझ्याप्रमाणेच आपल्याही आयुष्यामध्ये अशाप्रकारचे प्रसंग उद्भवले असतील. ज्या कारणांमुळे मला धर्मांतर करावे असे वाटते ती कारणे सिद्ध करून देण्याकरिता माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही चार-पाच गोष्टींचा माझ्या मनावर कायमचा ठसा उमटला आहे, त्यापैकी मी आपणाला आजच्या प्रसंगी दोन-तीन गोष्टी सांगणार आहे.

माझा जन्म मह, इंदोर येथे माझे वडील पलटणीत असताना झाला. त्यावेळी माझे वडील पलटणीत सुभेदार होते. आम्ही पलटणीतच राहात असल्यामुळे आम्हाला बाहेरच्या जगाचा संपर्क झाला नव्हता. त्यामुळे अस्पृश्यतेसंबंधी कोणत्याही प्रकारची कल्पना मला नव्हती. परंतु जेव्हा माझ्या वडिलांनी पेन्शन घेतले तेव्हा आम्ही सर्वजण साताऱ्यास येऊन राह्यलो. माझी आई मी अवघ्या पाच वर्षाचा असताना निवर्तली. सातारा जिल्ह्यात गोरेगावी दुष्काळ पडला होता. म्हणून दुष्काळी कामे सरकारने काढली. यावेळी एक पाण्याचा तलाव सुरू करण्यात आला होता. या तलावाचे काम करणाऱ्या मजूरांना पगार वाटण्याच्या कामावर माझ्या वडिलांची नेमणूक झाली. ते गोरेगावी गेले व आम्हा चार मुलांना साताऱ्यास ठेविले. जवळ जवळ चार पाच वर्ष आम्ही भातावर काढली. आम्ही साताऱ्यास आल्यापासून आम्हाला खऱ्या अस्पृश्यतेची जाणीव होऊ लागली. प्रथम आमचे केस कापण्यास आम्हाला न्हावी मिळेना. आमची मोठी पंचाईत झाली. मग माझी वडील बहीण ती अजून जिवंत आहे. ती आम्हा चार मुलांच्या हजामती ओट्यावर बसून करीत असे. साताऱ्यास इतके न्हावी असूनही ते आमची का हजामत करीत नाहीत हे मला प्रथमच कळले. दुसरा एक प्रसंग असा घडला की, आमचे वडील गोरेगाव येथे असताना ते आम्हाला पत्र पाठवीत असत. त्यांनी आम्हाला एकदा ' गोरेगावला या ' असे पत्र पाठविले होते. गोरेगावला आम्ही आगगाडीत बसून जाणार म्हणून मला फार आनंद झाला होता. तोपर्यंत मी आगगाडी पाहिली नव्हती. वडिलांनी पाठविलेल्या पैशाचे आम्ही चांगले कपडे केले व मी, माझा भाऊ आणि बहिणीच्या मुली इतके जण वडिलांना भेटावयास निघालो. त्यापूर्वी त्यांना पत्र लिहिले होते. परंतु ते पत्र नोकराच्या हलगर्जीपणामुळे त्यांना मिळाले नाही आणि त्यामुळे आम्ही गोरेगावी केव्हा येणार हे त्यांना कळले नाही. आम्ही मात्र वडील आम्हाला नेण्याकरिता नोकर वगैरे पाठवितील या आनंदात होतो. परंतु या बाबतीत आमची निराशा झाली. आम्ही आगगाडीतून उतरताच नोकराची वाट पाहिली. माझा पोशाख ब्राह्मणासारखा दिसत होता. गाडी येऊन निघून गेली. आम्ही अर्धा-पाऊण तास स्टेशनवर वाट पाहात राहिलो. स्टेशनवर आम्हाशिवाय कुणीच राहिले नाही. तशात आम्ही