डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ४८०
लोकांना कळली होती. माझे पार्शी म्हणून धर्मशाळेत गुप्तपणे राहाणे वगैरे गोष्टी लोकांना शंका येण्यास कारणीभूत होऊन माझ्या गुप्तपणाचा स्फोट झाला. धर्मशाळेत राहाणारा मीच तो महार हे तेथील पार्शी लोकांना कळले. दुसरे दिवशी मी जेवण वगैरे करून ऑफिसला जाण्याकरिता निघालो असताना पंधरा-वीस पार्शी हातात काठ्या घेऊन मला ठार करण्याकरिता तेथे आले. त्यांनी प्रथम ' तू कोण आहेस ? ' असे विचारले, मी फक्त ' हिंदू ' आहे. असे उत्तर दिले. परंतु त्यांचे या उत्तराने समाधान झाले नाही. त्यांनी हमरी-तुमरीवर येऊन जागा ताबडतोब सोडण्यास सांगितले. त्यावेळी माझ्या मनोधेर्याचे मला विलक्षण पाठबळ मिळाले. मी त्यांच्याजवळ निर्भयपणे आठ तासांची मुदत मागितली व ती त्यांनी दिली. मी सबंध दिवस राहावयास जागा मिळविण्याचा कसून प्रयत्न केला. परंतु मला कुठेच जागा मिळेना. कित्येक मित्रांकडे गेलो. त्यांनी निरनिराळी कारणे सांगून मला वाटेला लावले, मी शेवटी इतका कंटाळलो की आता पुढे काय करावे हेच मला कळेना. मी एका ठिकाणी खाली बसलो. माझे मन उद्विग्न बनले व डोळ्यातून सारखा अश्रूप्रवाह वाहू लागला. (यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. अस्पृश्यतेच्या भडाग्रीने त्यांचे अंतःकरण होरपळून गेलेले दिसत होते.) शेवटी अगदीच नाइलाज झाल्यावर मला बडोद्याची नोकरी सोडून रात्रीच्याच गाडीने मुंबईस यावे लागले. माझ्यावरील प्रसंगाप्रमाणे तुमच्यावरही असले अनेक प्रसंग येऊन गेले असतील. म्हणून म्हणतो की, ज्या समाजात माणुसकी नाही, थारा नाही त्या समाजात निष्कारण मानहानी भोगीत जीवन कंठण्यात काय अर्थ! जोअसल्या निर्दय धर्मात राहिल तो गुलाम आहे. ज्याला माणुसकी पाहिजे तो या सैतानी धर्मात राहणार नाही.
माझे वाडवडील या हिंदू धर्मात राहिले परंतु त्यांना हिंदू धर्माच्या नियमाप्रमाणे शिक्षण घेता आले नाही. त्यांना शस्त्र हातात धरण्याची धर्माने परवानगी दिली नव्हती. मुबलक संपत्ती मिळविणे धर्माच्या नियमाप्रमाणे त्यांना अशक्य होते. यामुळे आमच्या वाडवडिलांना या तिन्ही गोष्टी संपादन करता आल्या नाहीत. मला उच्च शिक्षण घेताना संस्कृत भाषा शिकावयाची होती. परंतु ती गोष्ट मला धर्म बंधनामुळे त्यावेळी शक्य झाली नाही. परंतु आता विद्या शिकणे, संपत्ती मिळविणे व शस्त्र हाती धरणे शक्य झाले आहे. अशा परिस्थितीत ज्या धर्माने तुमच्या पूर्वजांना गुलामगिरीत खितपत ठेवले, कोणत्याही परिस्थितीचा उपयोग करू न देता तुम्हाला अज्ञानात व दारिक्र्यात राहावयास भाग पाडले त्या हिंदू धर्माची तुम्ही का पर्वा बाळगता ? वाडवडिलांप्रमाणेच त्या हतबल, स्वाभिमानशून्य परिस्थितीचीच पाऊलवाट तुम्हाला आक्रमण करावयाची असल्यास तुम्हाला कुणी विचारणार नाही. तुमची कोणीही पर्वा बाळगणार नाही. धर्मांतराच्या प्रश्नाचे