आपल्या मातीमोल आयुष्याला . . , . . . आवश्यकता आहे ४८१
आज महत्त्व आहे ते याचमुळे. हिंदूधर्मात राहिल्याने तुम्हाला गुलामापेक्षा श्रेष्ठ
दर्जा प्राप्त होणार नाही. मी जरी अस्पृश्य राहिलो तरी हिंदू समाजातील एखादी व्यक्ती जे करू शकेल ते मला सहज करता येईल. माझ्या हिताहिताचा प्रश्न हिंदू धर्मात राहिल्याने किवा न राहिल्याने सुटणार नाही, मी आजच्या परिस्थितीत हायकोर्टाचा जज् होऊ शकेन, कायदे कौन्सिलमध्ये मिनिस्टरचीसुद्धा जागा मिळवू शकेन, परंतु केवळ तुमच्या माणुसकीकरीता मला धर्मातर करणे अगदी आवश्यक झाले आहे. आपल्या मातीमोल आयुष्याला सोन्याचे दिवस प्राप्त होण्यासाठीच मला धर्मांतराची आवश्यकता भासत आहे. तुमची स्थिती सुधारण्यासाठी माझ्या सहकारी मित्रांकडून अवश्य सहाय्य मिळेल, अशी मला खात्री वाटते. तुम्हाला कर्तबगार बनविण्यासाठी मला धर्मांतर करावयाचे आहे. माझ्या हिताच्या प्रश्नाबद्दल मी अगदी बेफिकीर आहे. आज जेमी कार्य करीत आहे ते सर्व तुमच्याच हितासाठी करीतं आहे. मला तुम्ही ईश्वर मानता. परंतु मी ईश्वर नाही. मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे. माझ्यापासून तुम्हाला जी काही मदत पाहिजे आहे, ती मी द्यायला तयार आहे. तुम्हाला तुमच्या आजच्या वाईट स्थितीतून मुक्त करण्याचे मी ठरविले आहे. माझ्यासाठी मी काही करीत नाही, तुम्हाला कर्तबगार बनता येईल इतके कसोशीचे प्रयत्न मात्र मी करीत राहणार. तुम्ही आपल्या परिस्थितीची जाणीव करून घ्या व मी जो मार्ग दाखवीन तो अनुसरा. म्हणजे तुमचे हित, तुमची कर्तबगारी फळास आल्याशिवाय राहाणार नाही.