३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 526

८९
मुक्ती कोन पथे ?

(दिनांक १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवले मुक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, ' मी अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन जन्माला आलो पण ती गोष्ट माझ्या स्वाधिन नव्हती. तथापि, हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही. ' अशी क्रांतिकारी ऐतिहासिक घोषणा केली. या घोषणेमुळे संपूर्ण हिंदू तसेच इतर धर्मातील लोक खडबडून जागे झाले. त्यावर अनुकूल तशाच प्रतिकूल प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. सर्व बाजूंनी विचारविनिमय करून पुढील कार्याची रुपरेषा आखण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल मुंबई इलाखा महार परिषदेच्या तर्फे मुंबई येथे दिनांक ३०-३१ मे, १ जून १९३६ ला परिषदेचे आयोजन केले होते. याच प्रसंगी मुंबई इलाखा संत समाजाची परिषद, मुंबई इलाखा मातंग परिषद तसेच राजकीय परिषद यांचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी निघालेली पत्रके, कार्यक्रमाचे वृत्त, दिलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे अंतर्भूत करीत आहोत. या सर्व परिषदांचे बाबासाहेब आंबेडकरांच्या आमूलाग्र समाज परिवर्तनाच्या क्रांतीत अन्यन्यसाधारण ऐतिहासिक रथान आहे.

' मुक्ती कोन पथे ?' या मुख्य भाषणानंतर मुंबई इलाखा अस्पृश्य संत समाजाची परिषद; राजकीय परिषद आणि मुंबई इलाखा मातंग परिषद यात झालेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे क्रमशः स्वतंत्रपणे देत आहोत.

-संपादक)

_ अखिल मुंबई इलाखा महार परिषद आयोजित करण्याविषयक भूमिका दर्शविणारे जाहीर विनंतीपत्रक येणेप्रमाणे-

“ अखिल अस्पृश्यांचे एकमेव पुढारी दीनबंधू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तारीख १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवले (जिल्हा नाशिक) येथे भरलेल्या परिषदेत सांगितले की, हिंदू धर्माची समाजरचना विषमतेच्या पायावर उभारलेली असल्यामुळे आपण हिंदू या नात्याने माणुसकीचे हक्क मिळविण्याकरिता कसेही आणि कितीही प्रयत्न केले तरी आपणास यश मिळणे शक्‍य नाही. आपण महाड, नाशिक व इतर ठिकाणी सत्याग्रह करून समानतेचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी निकराचा व जोराचा प्रयत्न करून पाहिला, परंतु त्या लढ्यामध्ये आपले द्रव्यबळ व मनुष्यबळ खर्च झाले आणि त्यात आपणास यश मिळण्याऐवजी आपल्या