३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 535

मुक्ती कोन पथे ? ४९१

सत्याग्रहाच्या स्मरणाप्रित्यर्थ मंडपाच्या दोन्ही दरवाज्यांना ' महाड दरवाजा ' व ' नाशिक दरवाजा ' अशी नावे ठेविण्यात आली होती.

अशा या नयनमनोहर आणि भव्य मंडपात मुंबई इलाखा महार परिषदेचे अधिवेशन अपूर्वं उत्साहाने आणि यशस्वी रीतीने पार पडले. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी हैद्राबादचे सुप्रसिद्ध अस्पृश्य पुढारी मि. बी. एस. व्यंकटराव ऊर्फ हैद्राबादी आंबेडकर यांची योजना झाल्यामुळे परिषदेच्या नावलौकिकात विशेष भर पडली होती.

ही परिषद मुंबई इलाख्यासाठी असताही मध्यप्रांत, वऱ्हाड, इंदूर, महू, हैद्राबाद वगैरे परप्रांतातील प्रमुख पुढारी मंडळी या परिषदेला हजर राहिली होती. मुंबईला ही अस्पृश्य समाजातील महार बांधवांची प्रचंड परिषद पाहून स्पृश्य जनतेच्या दृष्टिकोनात फरक झाल्याशिवाय राहणार नाही. महार समाजातील प्रत्येक व्यक्तीने या परिषदेत आपुकलीने भाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील आपले अढळ असलेले प्रेम व्यक्त केले. परिषदेसाठी आलेल्या हजारो महार बांधवांची शिस्त वाखाणण्यासारखी होती. या परिषदेची व्यवस्था ठेवण्यात समता सैनिक दलाने केलेली कामगिरी वाखाणण्यासारखी अशीच झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परिषदेसाठी रात्रंदिवस जातीने मेहनत घेतली होती. कोणाही प्रतिनिधीची, निमंत्रित पाहुण्याची वगैरे गैरसोय होऊ नये, या विषयी राखीव व्यवस्थापक मंडळींनी विशेष खबरदारी घेतली होती. परिषदेस अस्पृश्य वर्गाचे पुढारी डॉ. पी. जी. सोळंकी यांचीही डॉ. आंबेडकर साहेबांना विशेष मदत झाली. परिषदेस आलेल्या मंडळीत मे. भास्करराव जाधव, शेठ शंकरराव परशा, पी. आर. लेले, पी. जी. अभ्यंकर, डॉ. सोळंकी, अमृतराव रणखांबे, भाऊराव गायकवाड, अँडव्होकेट पाध्ये, बॅ. समर्थ, सौ. वत्सलाबाई शेगावकर, सौ. वेदक, सौ. डॉ. चंपूताई प्रधान, देवराव नाईक, अनंतराव चित्रे, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस, नागपूरचे मेश्राम, एम्‌. के. कर्णिक, एल. एन. हरदास, शेठ मनियार वगैरे प्रमुख मंडळी हजर होती.

सोमवार ता. १ जून १९३६ रोजी सकाळी डॉ. आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई संत समाजाची परिषद झाली. यावेळी स्वागताध्यक्ष श्री. शंकरदास नारायणदास बर्वे यांचे परिणामकारक असे भाषण झाले. अध्यक्ष या नात्याने डॉ. आंबेडकर यांनी केलेले भाषण संत जनतेच्या अंतःकरणात खळबळ उडवून देण्यास कारणीभूत झाले. पूर्वी निर्धार केल्याप्रमाणे शेकडो संतानी आपल्या दाढ्यामिशा, जटा, माळा अग्नीकुंडात अर्पण केल्या. रात्री डॉ. आंबेडकर यांच्याच अध्यक्षतेखाली राजकीय परिषद भरली होती. यावेळी त्यांनी नवीन सुधारणा व नवीन कायदे कौंन्सिलच्या निवडणुकी कशा [लढवाव्यात ] याविषयी परिणामकारक विवेचन केले.