४९२ डॉ. बावासाहेव आंवेडकर लेखन आणि भाषणे
परिषदेतील गायनाचा कार्यक्रम
परिषदेच्या कार्यक्रमात ईशस्तवन, स्वागत व आभारप्रदर्शनाची गाणी ज्या मुलींनी सुस्वर आवाजात म्हटली व लोकरंजन केले त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :-
कु. कमळाबाई अमृतराव रणखांबे.
` पार्वतीबाई बळीराम पंडीत.
“ शांताबाई बळीराम नेवाळकर.
- गोदावरी महादेव रोकडे.
ˆ मनोरमा बळीराम भातनकर.
* कुसूम लक्ष्मण जाधव.
“ चांगुणाबाई भागोजी कांबळे.
- प्रेमाबाई चरणदास गायकवाड.
मे. नामदेव महादेव सुर्वे (पेटीवादन), शंकर अर्जुन सोनवणे (तबला), हिराजी रामचंद्र औंधकर (दिलरुबा), महादेव पाचरडकर (सतार) इत्यादि मंडळींनी निरनिराळया वाद्यात दाखविलेले प्राविण्य वाखाणण्यासारखे होते. “१
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण
“ अखिल मुंबई इलाखा महार परिषदेत दि. ३१ मे १९३६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले ; ते परिषदेला संबोधित करताना म्हणाले,
सद्गृहस्थ, बांधवांनो आणि भगिनींनो,
ही परिषद मी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा विचार करण्याकरिता मुद्दाम बोलावण्यात आलेली आहे, हे तुम्हास कळून चुकले आहेच. धर्मांतराचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळयाचा आहे. इतकेच नव्हे तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीने त्याच्यावर अवलंबून असल्याकारणाने तो विषय मला अत्यंत महत्त्वाचाही वाटतो. हे महत्त्व तुम्हा सर्वांना पटले आहे असे म्हणण्यास काही हरकत वाटत नाही. तसे नसते तर आज एवढ्या मोठ्या समुदायाने तुम्ही येथे जमला नसता आणि म्हणून तुम्ही सर्वजण जे या ठिकाणी जमला आहात ते पाहून मला अतिशय आनंद वाटतो. |
परिषदेची आवश्यकता
धर्मातराची घोषणा केल्यापासून अनेक ठिकाणी लहान-मोठ्या प्रमाणावरती सभा भरवून आपल्या लोकांनी या विषयावरील आपले मत व्यक्त केलेले सर्वांच्या कानी आलेले आहे. परंतु सर्वानी एके ठिकाणी जमून विचारविनिमय करून धर्मांतराच्या प्रश्नाची निर्णयात्मक चर्चा करण्याची संधी आजपावेतो आपल्याला प्राप्त झालेली नव्हती. तशा संधीची तुमच्यापेक्षा मला अत्यंत जरूरी होती.