मुक्ती कोन पथे ? ४९३
धर्मातराची मोहीम सफल होण्याकरिता पुर्वतयारीची फारच आवश्यकता आहे. ही
गोष्ट तुम्हा सर्वांना कबूल करावी लागेल. धर्मांतर हा काही पोरखेळ
नव्हे. धर्मांतर हा मौजेचा विषय नव्हे. हा प्रश्न माणसाच्या जीविताच्या
साफल्याचा प्रश्न आहे. जहाजातून एका बंदराकडून दुसऱ्या बंदराला
नेण्याकरिता नावाड्याला जेवढी पूर्वतयारी करावी लागते तेवढीच पूर्वतयारी
धर्मातराकरिता करावी लागणार आहे. त्याशिवाय हा तीर सोडून पैलतीर गाठणे शक्य होणार नाही. परंतु नावेत किती उतारु येतात याचा अंदाज समजल्याखेरीज नावाडी सामानसुमान जमविण्याच्या प्रयत्नास लागत नाही. त्याचप्रमाणे माझीही स्थिती आहे. किती लोक धर्मातर करण्यास तयार आहेत, याचा कयास लागल्याशिवाय मला धर्मांतराची पूर्वतयारी. करण्याच्या उद्योगास लागणे शक्य नाही. परंतु आपल्या लोकांची कोठेतरी एकत्रित अशी परिषद झाल्याशिवाय लोकमताचा ठाव मिळणे शक्य नव्हते. अशाप्रकारे लोकमताचा ठाव घेण्याची संधी मला प्राप्त झाली पाहिजे, असे जेव्हा मी मुंबईच्या कार्यकर्त्या लोकास सांगितले तेव्हा त्यांनी खर्चाची अगर परिश्रमाची सबब पुढे न करता परिषद भरविण्याची जबाबदारी आपल्या अंगावर मोठ्या खुषीने घेतली. ती जबाबदारी पार पाडण्याकरिता त्यांना किती कष्ट सोसावे लागले याची हकीगत आपले परमपूज्य पुढारी व स्वागत मंडळाचे अध्यक्ष राजमान्य राजश्री रेवजी दगडूजी डोळस यांनी आपल्या भाषणात सविस्तरपणे सांगितली आहे. इतक्या खस्ता खाऊन त्यांनी माझ्याकरिता हा जो सभेचा घाट घडवून आणला त्याकरिता मी परिषदेच्या स्वागत मंडळाचा अत्यंत ऋणी आहे.
नुसत्या महारांचीच परिषद का ?
माझी धर्मांतराची घोषणा जर सर्व अस्पृश्यांकरिता आहे तर मग सर्व अस्पृशांची सभा का बोलविली नाही, नुसत्या महारांचीच सभा का बोलावण्यात आली, असा आक्षेप काही लोक घेण्याचा संभव आहे. ज्या प्रश्नाची चर्चा करण्याकरिता ही सभा बोलावण्यात आली आहे त्या प्रश्नाचा खल करण्यापूर्वी या आक्षेपाला उत्तर देणे मला आवश्यक वाटते. महारांचीच सभा का बोलाविली व सर्व अस्पृश्यांची सभा का बोलाविली नाही, याला अनेक कारणे आहेत. पहिले कारण असे की, या परिषदेत कसल्याही प्रकारच्या मागण्या मागावयाच्या नाहीत. सरकारपासून काही राजकीय हक्क मागावयाचे नाहीत किंवा हिंदू लोकांपासून काही सामाजिक हक्क मागावयाचे नाहीत. आपल्या जीविताचे काय करावयाचे, आपल्या आयुष्यक्रमाची रूपरेखा कशी ठरवावयाची, एवढाच प्रश्न या परिषदेपुढे आहे. तो प्रश्न ज्या त्या जातीला सोडवता येण्यासारखा आहे व तो ज्या त्या जातीने स्वतंत्र विचार करून सोडवणे बरे. ज्या कारणांकरिता सर्व अस्पृश्य लोकांची सभा एकत्रित करण्याची मला आवश्यकता वाटली नाही, त्यापैकी हे एक कारण आहे. नुसती महारांचीच परिषद भरविण्याचे दुसरेही एक कारण आहे. धर्मांतराची घोषणा केल्यापासून आज जवळ जवळ दहा महिन्यांचा अवधी