३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 538

४९४ डॉ. बाबासाहेव आंवेडकर लेखन आणि भाषणे

लोटलेला आहे. या अवधीत लोकजागृतीचे काम पुष्कळसे झाले आहे. आता लोकमत अजमाविण्याची वेळ आली आहे. असे मला वाटते. हे लोकमत अजमाविण्याला निरनिराळ्या जातीची सभा करणे हे एक साधे आणि सोपे साधन आहे, अशी माझी समजूत आहे. धर्मांतराचा प्रश्‍न कृतीत उतरविण्याकरिता जो प्रयत्न करणे आवश्यक आहे तो प्रयत्न करण्यापूर्वी खरे लोकमत काय आहे याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि माझी अशी समजूत आहे की, जाती जातीची सभा करून अजमाविलेल्या लोकमताबद्दल जशी खात्री देता येईल, तशी सर्वसाधारण अस्पुश्यांची सभा भरवून अजमाविलेल्या लोकमताबद्दल देता येणार नाही. कारण सर्व अस्पृश्यांची परिषद असे नाव देऊन जरी सभा बोलविली तरी ती सर्व अस्पृश्यांची प्रातिनिधीक स्वरुपाची सभा होऊ शकणार नाही. तसे होऊ नये व लोकमताची खात्री करून घेता यावी म्हणूनच नुसत्या महार लोकांची सभा भरविण्यात आलेली आहे. या सभेत इतर जातींचा समावेश न केल्यामुळे त्यांचे काही नुकसान होऊ शकत नाही. त्यांना धर्मातर करावयाचे नसेल तर त्यांचा या सभेत समावेश न केल्यामुळे त्यांना वाईट वाटण्याचे काही कारण नाही. त्यांना धर्मांतर करावयाचे असेल तर या सभेत त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता म्हणून त्यांच्या धर्मातरात कसलीही आडकाठी येऊ शकणार नाही. जशी महार लोकांची सभा भरविण्यात आलेली आहे तशीच अस्पृश्यांतील इतर जातींना आपापल्या जातीच्या सभा भरवून या विषयासंबंधाने आपले लोकमत व्यक्‍त करण्याची संधी मोकळी आहे व तशा सभा त्यांनी कराव्या, अशी मी त्यांना सूचना करतो आणि त्या कामी त्यांना माझ्याकडून जी मदत होण्यासारखी असेल ती मी अवश्य करीन. येथवर झाली ती केवळ प्रस्तावना झाली. आता मी आजच्या सभेच्या मुख्य विषयाकडे वळतो.

धर्मांतराचा विषय जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो गहनही आहे. साध्या माणसाच्या बुद्धीला त्याचे आकलन होणे कठीण आहे. तसेच साध्या माणसाला धर्मांतरासारख्या विषयाची समजूत करून देणे हे काम काही सोपे दिसत नाही. तथापि, तुम्हा सर्वांची समजूत पटल्याशिवाय धर्मातर कृतीत उतरविणे कठीण आहे, याची जाणीव मला पूर्णपणे आहे आणि म्हणून जितक्या सुलभरितीने या विषयीची मांडणी मला करता येईल तितक्या सुलभरितीने मी ती करणार आहे.

धर्मांतराची ऐहिक कारणे

धर्मातराच्या विषयावर दोन दृष्टीने विचार केला पाहिजे. सामाजिक दृष्टीने विचार केला पाहिजे, तसाच धार्मिक दृष्टीनेही विचार केला पाहिजे, ऐहिक दृष्टीने विचार केला पाहिजे, तसेच तात्त्विक दृष्ट्याही विचार केला पाहिजे. परंतु कोणत्याही दृष्टीने धर्मांतराचा विचार करू लागलो तरी प्रथमतः अस्पृश्यता ही काय बाब आहे, तिचें खरे स्वरूप काय, याचा पुरता समज करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय माझ्या धर्मातराच्या घोषणेचा अर्थ तुम्हाला कळणे शक्य होणार नाही. अस्पृश्यता ही काय बाब आहे व तिचे खरे स्वरूप काय आहे,