३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 539

मुक्ती कोन पथे ? ४९५

याचा तुम्हास समज व्हावा म्हणून प्रथमतः तुमच्यावर होत असलेल्या जुलूमाच्या कहाणीची तुम्हाला आठवण करून देणे आवश्यक वाटते. सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहीरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे स्पृश्य हिंदुनी मारहाण केल्याची उदाहरणे नेहमीच घडत असल्याकारणाने ती सर्वाच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. परंतु मारहाण करण्याची दुसरी अशी अनेक कारणे आहेत की ज्यांचा उल्लेख केला असता हिंदुस्थानच्या बाहेरील लोकांना तरी त्याचा विस्मय वाटेल. उंची पोषाख घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. दागदागिना घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. पाणी आणण्याकरिता तांब्या-पितळेची भांडी वापरल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. जमीन खरेदी केल्यामुळे जाळपोळ केल्याचे उदाहरण देता येईल. जानवे घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या स्पृश्य हिंदुस जोहार न घातल्यामुळे, शौचास जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे छळ झाल्याची उदाहरणे देता येतील व पंचाच्या पंक्तीत चपाती वाढल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण नुकतेच घडले आहे. वरील प्रकारचे जोरजुलूम झाल्याचे व तुम्हाला अमानुष तऱ्हेने वागविल्याची अनेक प्रकरणे तुमच्या ऐकिवात असतील व तुमच्यापैकी काहींना तर त्याचा प्रत्यक्ष अनुभवही असेल. जेथे मारहाण करता येण्यासारखे नसेल तेथे बहिष्काराच्या शस्त्राचा तुमच्याविरूध्द कसा उपयोग करण्यात येतो हेही तुम्हास अवगत आहेच. मोलमजुरी मिळू द्यावयाची नाही, रानातून गुरांना जाऊ द्यावयाचे नाही, माणसांना गावात येऊ द्यावयाचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी तुमच्या लोकास जेरीस आणल्याची आठवण तुम्हांपैकी पुष्कळांना असेल. परंतु हे असे का घडते, याच्या मुळाशी काय आहे, ही गोष्ट माझ्या मते तुमच्यापैकी फारच थोड्या लोकांना कळत असेल. ती समजून घेणे माझ्यामते अत्यंत आवश्यक आहे.

ही वर्गकलहाची बाब आहे

वर जी कलहाची उदाहरणे दिली आहेत तिच्याशी व्यक्तीच्या गुणावगुणांचा काही संबंध नाही. दोघा खटनटातील तो कलह नव्हे. अस्पृश्यतेचा प्रश्‍न हा वर्गकलहाचा प्रश्‍न आहे. स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजातील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या आगळिकीचा हा प्रश्‍न नव्हे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्‍न नव्हे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या आगळिकीचा हा प्रश्‍न आहे. हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या अन्यायाचा प्रश्न आहे. हा वर्गकलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे या संबंधाचा हा कलह आहे. या कलहाची जी वर उदाहरणे दिली आहेत त्यावरून जी एक बाब उघडपणे सिध्द होत आहे ती ही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना