३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 540

४९६ डॉ. वाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे

वरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे जर नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे, उंची पोशाख घातल्यामुळे, जानवी घातल्यामुळे, तांब्या-पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरून वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली नसती. जो अस्पृश्य चपाती खातो, उंची पोशाख करतो, तांब्यांची भांडी वापरतो, घोड्यावरून वरात नेतो तो वरच्या वर्गाचे कोणाचे नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा ? या रोषाचे कारण एकच आहे व ते हेच की अशी समतेची वागणूक त्यांच्या मानहानीला कारणीभूत होते. तुम्ही खालचे आहात, अपवित्र आहात, खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलेत तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील. पायरी सोडली तर कलहाला सुरूवात होते, ही गोष्ट निर्विवाद आहे. वरील उदाहरणावरून आणखी एक गोष्ट सिध्द होते ती ही की अस्पृश्यता ही नैमित्तिक नसून नित्याची आहे. हीच गोष्ट स्पष्ट भाषेत सांगावयाची म्हणजे हा स्पृश्य आणि अस्पृश्य यामधील कलह नित्याचा आहे व तो त्रिकालाबाधित असा राहणार आहे. कारण ज्या धर्मामुळे तुम्हाला खालची पायरी देण्यात आलेली आहे तो धर्म वरच्या वर्गाच्या म्हणण्याप्रमाणे सनातन आहे. त्याच्यात कोणत्याही प्रकारचा कालमानानुसार फेरबदल होऊ शकत नाही. तुम्ही आज जसे खालचे आहात तसेच तुम्ही नेहमी खालचे राहिले पाहिजे. याचाच अर्थ असा की, स्पृश्य व अस्पृश्य यांचेमधील हा कलह कायमचा राहणार आहे. या कलहातून तुमचा निभाव कसा लागणार हा मुख्य प्रश्‍न आहे व त्या प्रश्‍नाचा विचार केल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही, असे माझे मत आहे. तुमच्यापैकी ज्यांना हिंदू लोक वागवतील त्याप्रमाणे वागावयाचे असेल, त्यांचा सेवाधर्म पत्करून जगावयाचे असेल, त्या लोकांना या प्रश्‍नांचा विचार करण्याचे काही प्रयोजन नाही. परंतु ज्यांना स्वाभिमानाचे जिणे आवश्यक वाटते, ज्यांना समतेचे जिणे आवश्यक वाटते त्यांना या प्रश्‍नांचा विचार केल्याखेरीज गत्यंतर नाही. कोणत्या तऱ्हेने या कलहात आपला बचाव करता येईल, याचा विचार करणे त्यांना आवश्यक आहे. या कलहातून आपला बचाव कसा होईल ? या प्रश्‍नाचा निर्णय करणे मला तरी मोठेसे कठीण वाटत नाही. येथे जमलेल्या तुम्हा सर्व लोकांना एक गोष्ट कबूल करावी लागेल व ती ही की, कोणत्याही कलहात ज्याच्या हाती सामर्थ्य असते त्याच्याच हाती जय असतो. ज्याला सामर्थ्य नाही त्याने यशाची आशा बाळगावयास नको. ही गोष्ट सर्वांच्या अनुभवाने सिध्द झालेली आहे. तिच्या समर्थनार्थ पुरावा देण्याचे कारण नाही.