मुक्ती कोन पथे ? ४९७
प्रथम सामर्थ्य मिळवा
याच्या पुढील प्रश्न जो तुम्ही विचारात घेणे आवश्यक आहे तो हा की, या कलहातून सुटका करून घेण्यास तुमच्या पदरी पुरेसे सामर्थ्य आहे काय ? मनुष्यमात्राला तीन प्रकारचे सामर्थ्य अवगत असते. एक मनुष्यबल, दुसरे द्रव्ययल आणि तिसरे मानसिक बल. या तीन बलांपैकी कोणते बल तुम्हाला उपलब्ध आहे, असे तुम्हाला वाटते ? मनुष्यबलाच्या दृष्टीने तुम्ही अल्पसंख्यांक आहात ही गोष्ट तर उघडच आहे. मुंबई इलाख्यात अस्पृश्य वर्गाची लोकसंख्या एक अष्टमांश एवढीच आहे. तीही संघटित नाही. आपसातील जातीभेदामुळे तिच्यात संघशक्तीचा पूर्ण अभाव आहे. संघटित नाही ती नाहीच पण एकत्रितही नाही. ती खेडोपाडी विखुरली गेलेली आहे. अशा कारणामुळे असलेल्या अल्पस्वल्प संख्येचा देखील संकटग्रस्त झालेल्या अस्पृश्य वर्गाच्या वस्तीस कोणत्याही प्रकारचा उपयोग होऊ शकत नाही. द्रव्यबलाच्या दृष्टीने पाहिले तर तुमची तीच गत आहे. तुमच्या जवळ थोडेबहुत मनुष्यबल आहे असे म्हटले असता चालेल पण तुमच्याजवळ द्रव्यबल मुळीच नाही, ही गोष्ट निर्विवाद आहे. तुम्हाला व्यापार नाही, उदीम नाही, नोकरी नाही आणि शेतीही नाही. वरच्या वर्गाचे लोक जो घासकुटका देतील त्याच्यावर आज तुमची उपजीविका आहे. तुम्हाला अन्न नाही, तुम्हाला वस्त्र नाही. तुमच्याजवळ द्रव्यबल ते काय असणार ? अन्याय झाला तर कोर्टातून दाद मागण्याइतकी अवकाद आज तुमच्यात नाही. तुमच्यातील आज हजारो लोक कोर्टाचा खर्च सोसण्याची ऐपत नसल्यामुळे हिंदुंकडून होणारा त्रास, विटंबना व जोर जुलूम अगदी मुकाट्याने सोशीत आहेत. मानसिक बलाची तर याहीपेक्षा अधिक उणिव आहे. शेकडो वर्षे वरिष्ठ वर्गाच्या सेवेत घालविली असल्यामुळे शेकडो वर्षे त्यांनी केलेली विटंबना, छी ; थू निमूटपणे सोसल्यामुळे उलट बोलण्याची सवय, प्रतिकाराची हिंमत नाहीशी झाली आहे. तुमच्यातील आत्मविश्वास, उत्साह व महत्वाकांक्षा यांचा बिमोड झाला आहे. तुमच्यात सर्व लोक हताश, दीनवाणे व निस्तेज झालेले आहेत, निराशेचे व नामर्दुमकीचे वातावरण सर्वत्र पसरले आहे. आपण काही करू शकू अशा प्रकारचा विचार देखील कोणाच्या ध्यानी मनी येऊ शकत नाही.
| तुमचाच छळ का होतो ?
वस्तुस्थितीचे मी हे केलेले वर्णन जर खरे असेल तर त्यापासून निघणारा सिध्दांत तुम्हा सर्वांना कबूल करावा लागेल व तो हा की तुम्ही तुमच्या सामर्थ्यावर अवलंबून राहाल तर तुम्हाला या जुलूमाचा प्रतिकार करता यावयाचा नाही. तुमच्यात सामर्थ्य नसल्यामुळेच तुमच्यावर जोर जुलूम होतो याबद्दल मला काडीचाही संशय नाही. या इलाख्यात तुम्हीच अल्पसंख्यांक आहात अशातला