३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 542

४९८ डॉ. वावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

काही भाग नव्हे. तुमच्याप्रमाणे मुसलमान देखील अल्पसंख्यांक आहेत. ज्याप्रमाणे महारमांगांची दोन चार घरे गावात असतात, त्याचप्रमाणे मुसलमानांचीही एकदोनच घरे गावात असतात. त्या मुसलमानांच्या वाटेस कोणीही जात नाही. परंतु तुमच्यावर मात्र सारखा जुलूम चाललेला असतो. याचे कारण काय ? दोन मुसलमानांची घरे असून त्यांच्या वाटेला गाव जात नाही. तुमची दहा घरे असूनही गाव तुमचा छळ करतो असे का होते ? हा प्रश्‍न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याची खोज तुम्ही चांगल्या रीतीने केली पाहिजे. माझ्या मते या प्रश्‍नाचे एकच उत्तर देता येईल व ते हे की, त्या दोन मुसलमानांच्या घराच्या पाठी साऱ्या हिंदुस्थानातील मुसलमान समाजाची शक्ती व सामर्थ्य उभे आहे, याची जाणीव हिंदू लोकांना असल्यामुळे त्या दोन मुसलमान घरांच्या वाटेस जाण्याची कोणाही हिंदुची सहसा छाती होत नाही. त्या दोन घराच्या वाटेस गेले असताना पंजाबपासून ते थेठ मद्रासपर्यंत मुसलमान समाज आपली शक्ती वेचून त्यांचे संरक्षण करील, अशी खात्री असल्यामुळे ती दोन मुसलमानांची घरे निर्भयपणे आपला व्यवहार करीत असतात. तुमच्या बाबतीत हिंदू लोकांची खात्री असते की, तुम्हाला कोणीही मदत करणार नाही, तुमच्याकरिता कोणी धाऊन येणार नाही, तुम्हाला पैशाची मदत होणार नाही व अधिकाऱ्यांचीही मदत होणार नाही. : मामलेदार व पोलीस हे त्यांचेच असल्यामुळे स्पृश्य अस्पृश्यांच्या वादात ते जातीला जागतात , कर्तव्याला जागत नाहीत, याची त्यांना खात्री असते. या तुमच्या असहाय स्थितीमुळेच तुमच्याशी हिंदू लोक जुलूमाची व अन्यायाची वागणूक करतात. येथवर मी जे विवेचन केले आहे त्यावरून दोन गोष्टी सिद्ध होत आहेत, त्यापैकी पहिली गोष्ट ही की सामर्थ्य असल्याशिवाय तुम्हाला या जुलूमाचा प्रतिकार करता येणे शक्य होणार नाही. दुसरी, प्रतिकाराला आवश्यक असलेले सामर्थ्य आज तुमच्या पदरी नाही. या दोन गोष्टी सिद्ध झाल्याबरोबर तिसरी एक आपोआपच सिध्द होते आणि ती ही की, हे आवश्यक असलेले सामर्थ्य तुम्हाला कोठून तरी बाहेरून मिळविले पाहिजे. हे सामर्थ्य तुम्हाला कसे मिळविता येईल, हाच खरोखरी महत्त्वाचा प्रश्‍न आहे आणि त्याचा तुम्ही निर्विकल्प मनाने विचार केला पाहिजे.

बाहेरुन सामर्थ्य आणले पाहिजे

या देशातील जातीभेद व धर्मभेद याचा लोकांच्या मनावर व नीतिमत्तेवर एक विलक्षण परिणाम घडून आलेला मला तरी दिसून येतो. या देशात दुःख, दारिद्र्य आणि क्लेश यांच्याकरिता कोणालाही खेद वाटत नाही व वाटलाच तर त्याच्या निवारणाकरिता कोणी प्रयत्न करीत नाही. आपल्या धर्मबांधवावर किंवा