३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 543

मुक्ती कोन पथे ? ४९९

जातिबांधवावर जर दुःखाचा, दारिद्र्याचा अथवा जुलूमाचा प्रसंग ओढवला तर त्याच्या निवारणाकरिता मात्र लोक सहाय्य करतात. ही नीतिमत्तेची दृष्टी कितीही विकृत असली तरी ती जारी आहे, हे कोणीही विसरुन चालता कामा नये. ज्या गावामध्ये अस्पृश्य लोकांवर हिंदुंकडून जुलूम होतो त्या गावात इतर धर्माचे लोक नसतात अशातला काही भाग नाही. अस्पृश्यांवर होत असलेला जुलूम अन्यायकारक आहे, ही गोष्ट त्यांना पटत नाही असेही नव्हे. होतो हा अन्याय आहे, असे वाटत असूनही ते त्यांच्या सहाय्यास धावून जात नाहीत. याचे कारण काय ? तुम्ही आम्हाला का मदत करीत नाही असा जर प्रश्‍न तुम्ही त्यांना केलात तर ' तुमच्या वादात आम्हास पडण्याचे कारण काय ? तुम्ही आमच्या धर्माचे असता तर आम्ही तुम्हाला सहाय्य केले असते, “ असे उत्तर ते तुम्हाला देतील. यावरून एक गोष्ट तुमच्या ध्यानात येऊ शकेल की कोणत्याही अन्य समाजाचा ऋणानुबंध तुम्ही जोडल्याशिवाय, कोणत्याही अन्य धर्मात सामील झाल्याशिवाय तुम्हाला बाहेरचे सामर्थ्य मिळू शकत नाही. याचाच स्पष्ट अर्थ असा आहे की, तुम्ही धर्मातर करून कोणत्या तरी अन्य समाजात अंतर्भूत झाले पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला त्या समाजाचे सामर्थ्य प्राप्त होऊ शकणार नाही आणि जोपर्यंत तुमच्या पदरी सामर्थ्य नाही तोपर्यंत तुम्हाला व तुमच्या भावी पिढीला आजच्या दीनवाण्या स्थितीमध्ये दिवस काढावे लागणार आहेत.

धर्मांतराची आध्यात्मिक कारणे

येथपर्यंत ऐहिक कल्याणाकरिता धर्मांतराची आवश्यकता काय आहे याचे दिग्दर्शन केले आहे. आता आध्यात्मिक कारणाकरिता धर्मांतराची कशी आवश्यकता आहे याविषयीचे माझे विचार तुमच्यासमोर मी मांडीत आहे. प्रथमतः धर्म कशाकरिता असतो, त्याची आवश्यकता काय, हे जाणून घेतले पाहिजे. धर्माच्या अनेक व्याख्या अनेक लोकांनी केलेल्या तुम्हाला सापडतील. पण त्या सर्वांमध्ये अर्थपूर्ण व सर्वांना पटण्यासारखी अशी एकच व्याख्या आहे. ' ज्याने सर्व प्रजेचे धारण होते तोच धर्म ' हीच ती खरी धर्माची व्याख्या होय. ही धर्माची व्याख्या मी केलेली नाही. ही व्याख्या सनातनी हिंदुंचे अग्रगण्य लो. टिळक यांनीच दिलेली ती व्याख्या आहे. तेव्हा धर्माच्या व्याख्येबद्दल मखलाशी केल्याचा आरोप माझ्यावर कोणी करू शकणार नाही. ही व्याख्या जरी मी केलेली नसली तरी मी वादाकरिता ती मान्य केलेली आहे अशातला भाग नाही. मला ती कबूल आहे. समाजाच्या धारणेकरीता घातलेली बंधने म्हणजेच धर्म हीच माझी