५०० डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
देखील धर्माची कल्पना आहे. ही व्याख्या वास्तविकदृष्ट्या अथवा तार्किक- दृष्ट्या योग्य अशी दिसली तरी समाजाच्या धारणेकरिता समाजाची बंधने कशा प्रकारची असावीत या प्रश्नाचा व्याख्येवरून काहीच बोध होऊ शकत नाही, अथवा उलगडाही होऊ शकत नाही. समाजाच्या योग्य धारणेकरिता समाजाची बंधने कशी असावीत हा प्रश्न शिल्लक राहतोच व हा प्रश्न धर्माच्या व्याख्येपेक्षा फार महत्त्वाचा आहे. कारण धर्म कोणता व अधर्म कोणता हे व्याख्येवर अवलंबून नसून बंधनांच्या हेतूवर व स्वरूपावर अवलंबून आहे. ज्या बंधनांनी समाजातील सर्व प्रजेची धारणा होऊ शकते ती बंधने कशी असावीत, म्हणजे खऱ्या धर्माचे स्वरुप कसे असावे याचा विचार करताना समाज आणि व्यक्ती यांचा तात्विक- दृष्ट्या संबंध काय व कसा असावा हा प्रश्न साहजिकपणेच उद्भवतो. या प्रश्नासंबंधाने आधुनिक समाजशास्त्रवेत्त्यांनी तीन प्रकारची मते प्रतिपादन केलेली आहेत. काहींच्या मते व्यक्तीमात्राला सुख प्राप्ती व्हावी हाच समाज घटनेचा अंतीम हेतू आहे. काहींच्या मते व्यक्तीमात्राला त्यांच्या अंगभूत गुणांचा व शक्तीचा विकास करता येऊन त्याला पूर्णावस्थेस पोहोचविण्यास मदत व्हावी हाच समाज संघटनेचा अंतीम हेतू असला पांहिजे व काहींच्या मते समाज संघटनेचा मुख्य हेतू व्यक्तीची उन्नती किंवा व्यक्तीचे सौख्य हा नसून आदर्शभूत समाज तयार करणे हाच होय. हिंदू धर्माची कल्पना या तीनही कल्पनाहून अगदी निराळी आहे. हिंदू धर्मात व्यक्तीला काही स्थान नाही. हिंदू धर्माची रचना वर्गाच्या कल्पनेवर केलेली आहे. एकाने दुसऱ्याशी कसे वागावे याची शिकवण हिंदू धर्मात नाही. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी कसे वागावे याची बंधने हिंदू धर्मात आहेत. ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो घर्म मला स्वतःला मान्य नाही. व्यक्तीच्या जीवनाला समाजाची जरी आवश्यकता असली तरी समाजाची धारणा हे धर्माचे अंतीम ध्येय होऊ शकत नाही. . व्यक्तीचा विकास हेच धर्माचे खरे ध्येय आहे असे मी समजतो. व्यक्ती ही जरी समाजांतर्गत असली, मनुष्यमात्र हा जरी समाजाचा एक घटक असला तरी त्यांचा आणि समाजाचा संबंध शरीर आणि अवयव, गाडा आणि त्याचे चाक यांचा जसा संबंध आहे तसा हा संबंध नव्हे, असे मी समजतो.
समाज आणि व्यक्ती
ज्याप्रमाणे पाण्याचा थेंब समुद्राच्या पाण्यात टाकला असताना त्याचा लोप होतो तसा माणसाचा तो केवळ समाजात राहिला म्हणून त्याचा लोप होऊ शकत नाही. त्याचे जीवन स्वतंत्र असते. त्याचा जन्म समाजाच्या सेवेकरिता नसून आत्मोन्नतीकरिता आहे. ह्या एकाच कारणामुळे सुधारलेल्या राष्ट्रात एका