५०२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
येईल काय ? उलटपक्षी त्यांचा तुमच्या विरुद्ध नेहमीचा कटाक्ष असतो, ही गोष्ट मात्र खरी आहे. हिंदुच्या मनात तुमच्याविरुद्ध असलेल्या कटाक्षाचा परिणाम किती विघातक झाला आहे, हे तुमच्यापैकी ज्या कोणाला दाद मागण्याकरिता कोर्टात जाण्याचा प्रसंग आलेला आहे किंवा सहाय्य मागण्याकरिता पोलिसाकडे जाण्याचा प्रसंग आला आहे तो आपल्या अनुभवाने सांगू शकेल. कोर्ट आपल्याला न्याय देईल, पोलीस आपल्याल! मदत करील, असा तुम्हापैकी कोणा एकाला तरी विंश्वास वाटतो का ? व तो जर वाटत नाही तर तशी वृत्ती होण्यास काय कारण आहे ? माझ्या मते अशा अविश्वासाचे कारण एकच आहेव ते हेच की हिंदू लोकांमध्ये तुमच्याबद्दल कोणत्याही प्रकारची सहानुभूती नसल्याकारणाने ते आपल्या अधिकाराचा सदुपयोग करतील अशी आशा तुम्हाला वाटत नाही. हे जर खरे आहे तर शत्रुत्वाने भरलेल्या या वातावरणात राहून तुम्हाला काय उपयोग होणार आहे ?
हिंदू समाजात तुमच्याकरिता समता आहे काय ?
हा प्रश्न खरोखरीच विचारावयास नको. अस्पृश्यता ही मूर्तिमंत असमानताच आहे. एवढी मोठी असमानतेची जांगती ज्योत कोठेच दिसावयाची नाही. अस्पृश्यतेपेक्षा जास्त उग्र स्वरुपाची असमानता जगाच्या इतिहासात अन्यत्र कोठेच सापडणार नाही. कमी अधिक भावामुळे एकाने आपली मुलगी दुसऱ्याच्या मुलाला न देणे, कमी अधिक भावामुळे एकाने दुसऱ्याच्या बरोबर सहभोजन न करणे, अशा प्रकारचे असमानतेचे निदर्शक वर्तन आपणास पाहावयास सापडते. परंतु एका माणसाला दुसऱ्या माणसाने न शिवण्याइतकी o पतित लेखण्याची प्रथा हिंदू धर्माखेरीज आणि हिंदू समाजाखेरीज अन्यत्र कोठेही सापडेल काय ? ज्याच्या स्पर्शाने माणूस बाटतो,ज्याच्या स्पर्शाने पाणी बाटते, ज्याच्या स्पर्शाने देव बाटतो तो प्राणी मानवाच्या कोटीत गणला गेला आहे, असे कोणी तरी म्हणेल काय ? अस्पृश्य माणसाकडे पाहण्याची दृष्टी आणि रक्तपितीने भरलेल्या माणसाकडे पाहण्याची दृष्टी यात काय फरक आहे ? रक्तपिती भरलेल्या माणसाबद्दल लोकांच्या मनात किळस जरी असली तरी त्याच्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती तरी असते. परंतु तुमच्याबद्दल सहानुभूती तर नसतेच पण किळस मात्र असते. रक्तपिती भरलेल्या माणसापेक्षादेखील तुमची स्थिती हीन आहे. अजूनही खेडेगावात एखादा स्पृश्य माणूस उपास सोडीत असताना जर महाराचा शब्द त्याच्या कानावर पडला तर तो अन्न ग्रहण करीत नाही. एवढा कलंक तुमच्या शरीराला, एवढा कलंक तुमच्या शब्दाला आहे. अस्पृश्यता हिंदू धर्मावरील कलंक आहे, असे काही लोक म्हणत आहित.