मुक्ती कोन पथे ? ५०३
पण त्या बतावणीत खरे म्हटले असता काही अर्थ नाही. हिंदू धर्म कलंकित आहे
असे एकही हिंदू मानीत नाही. तुम्ही कलंकित आहात, दूषित आहात, अपवित्र
आहात असे मात्र बहुजन हिंदू समाज मानतो. ही दशा तुम्हाला का प्राप्त झाली ? तुम्ही हिंदू धर्मात राहिल्यामुळे ही दशा तुम्हाला प्राप्त झाली आहे, असे मला वाटते. तुमच्यातील जे मुसलमान झाले त्यांना हिंदू अस्पृश्य मानीत नाहीत व असमान लेखीत नाहीत. तुमच्यातील जे खिस्ती झाले त्यांना हिंदू लोक अस्पृश्य मानीत नाहीत व असमान लेखीत नाहीत. नुकताच त्रावणकोर येथे घडलेला प्रकार विचारात घेण्यासारखा आहे. तेथील थिया जातीतील अस्पृश्य लोकास रस्त्यावरुन चालण्याची मनाई आहे. परवाच त्यांच्यापैकी काही जणांनी शीख धर्म स्वीकारला हे तुम्हास माहीत असेलच. अस्पृश्य असताना ज्या लोकांना त्या रस्त्यावरून चालता येत नव्हते त्याच लोकांनी शीख धर्म स्वीकारल्याबरोबर त्यांच्यावरची बंदी उठवली गेली. या सर्व गोष्टीवरुन एक गोष्ट सिद्ध आहे की तुमच्या अस्पृश्यतेला व तुमच्या असमानतेला जर काही कारण असेल तर ते तुमचा आणि हिंदू धर्माचा असलेला लागाबांधा हे होय.
या असमानतेच्या अन्यायात सांत्वन करण्याच्या हेतूने काही स्पृश्य लोक अस्पृश्यांना सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या, म्हणजे तुम्हाला शिवू ! तुम्ही स्वच्छ रहा म्हणजे तुम्हाला शिवू ! आणि समानतेने वागवू ! खरे म्हटले असता, अडाणी महाराची, दरिद्री महाराची आणि अस्वच्छ महाराची जी गत होते तीच गत शिकलेल्या महाराची, पैसेवाल्या महाराची आणि स्वच्छ राहणाऱ्या महाराची होते. हे तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवाने माहीत आहे, पण तो प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी जर शिक्षण घेतल्याशिवाय, हाती पैसा असल्याशिवाय, अंगावर पोषाख असल्याशिवाय मानमान्यता मिळणार नाही तर साध्या महाराने काय करावे ? ज्याला शिक्षण प्राप्त होऊ शकत नाही, ज्याला पैसा मिळू शकत नाही आणि ज्याला नीटनेटका पोषाख करता येत नाही त्या महाराला समानता कशी मिळणार ? खिस्ती धर्मात, मुसलमानी धर्मात जी समानतेची शिकवण देण्यात आली आहे तिचा संबंध विद्या. धन, पोषाख, पराक्रम अशा बाह्य वस्तूंशी मुळीच नाही. माणसाचे मनुष्यत्व हीच महत्त्वाची गोष्ट आहे, असे दोन्ही धर्म मानतात आणि ते मनुष्यत्व सर्वाना आदरणीय असले पाहिजे. कोणी कोणाचा अवमान करू नये व कोणी कोणाला असमान मानू नये, असे ते धर्म शिकवतात. हिंदू धर्मात या शिकवणीचा पूर्ण अभाव आहे. ज्या धर्मात मनुष्याच्या मनुष्यत्त्वाला व त्याच्या माणुसकीला काही किंमत नाही तो धर्म काय कामाचा ? आणि त्याला कवटाळून धरून राहण्यात काय हशील आहे ? याला उत्तर म्हणून काही हिंदू लोक उपनिषदांची साक्ष देतात व त्यात ईश्वर सर्वत्र भरला आहे, असे तत्त्व आहे,