३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 549

मुक्ती कोन पथे ? ५०५

हिंदू धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे काय ?

दरेक नागरिकाला जेवढे कायद्याने व्यवसाय स्वातंत्र्य आहे तेवढे व्यवसाय स्वातंत्र्य तुम्हालाही आहे, दरेक नागरिकाला कायद्याने जितके व्यक्तीस्वातंत्र्य आहे तेवढे व्यक्तीस्वातंत्र्य तुम्हालाही आहे, असे काही लोक म्हणतील. परंतु या म्हणण्यात खरोखरी काही अर्थ आहे काय, याचा खोल विचार तुम्ही करावयास पाहिजे. ज्याला जन्मजात धंद्याशिवाय दुसरा कोणताही धंदा समाज करू देत नाही त्या माणसाला तुला व्यवसाय स्वातंत्र्य आहे, असे सांगण्यात काय हशील आहे ? ज्याला संपत्ती मिळविण्याचे कोणत्याही प्रकारचे द्वार खुले नाही त्याला तुझ्या संपत्तीला कोणीही हात लावू शकणार नाही, तुझी संपत्ती उपभोगण्यास तू ' स्वतंत्र आहेस असे सांगण्यात काय तथ्य आहे ? जन्मजात अपवित्रतेमुळे ज्याचा नोकरीत प्रवेश होऊ शकत नाही, ज्याच्या हाताखाली नोकरी करण्याचा इतर लोकांना अपमान वाटतो अशा माणसास कोणत्याही नोकरीवर अधिकार सांगण्याचे, तुला स्वातंत्र्य आहे, असे सांगणे म्हणजे त्याची थट्टा करणे आहे. कायद्याने पुष्कळ हक्क दिले असतील, पण समाज त्यांचा उपयोग करू देईल तरच ते खरे हकक आहेत, असे म्हणता येईल. अस्पृश्यांनी चांगला पोषाख घालून हिंडावे असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज तसे कपडे वापरू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग ? अस्पृश्यांनी तांब्या-पितळेच्या भांड्यात पाणी आणावे असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज अस्पृश्यांना धातूची भांडी वापरू देत नाही, तर त्या हक्काचा काय उपयोग ? अस्पृश्यांनी आपल्या घरावर कौले घालावी असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज त्यास कोले घालू देत नाही, तर त्या हक्काचा काय उपयोग ? अशी पुष्कळ उदाहरणे देता येतील. परंतु सारांश हा की समाज उपभोगू देईल तोच हकक आपला असे म्हणता येईल. ज्या हक्काला समाजाची आडकाठी आहे, हरकत आहे तो हक्क कायद्याने जरी दिला असला तरी त्याचा काही उपयोग नाही. अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरूरी आहे. सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत तुम्हाला प्राप्त झाले नाही तोपर्यंत तुम्हाला कायद्याने कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला शारीरिक स्वातंत्र्य आहे, असे काही लोक सांगतील. तुम्हाला कायद्याची मनाई नसेल तिकडे जाता येते, कायद्याची मनाई नसेल त्या प्रकारे बोलता येते हे खरे, परंतु या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे ? मनुष्यमात्राला जसे शरीर आहे तसेच मनही आहे. जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकीच मानसिक स्वातंत्र्याचीही आवश्यकता आहे. नुसत्या शारीरिक स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही. महत्त्व आहे ते