५०६ डॉ. वाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मानसिक स्वातंत्र्याला. खरे म्हटले असता शरीराचे स्वातंत्र्य कशासाठी असते ? ज्याला त्याला मनसोक्त व्यवहार करता यावा एवढ्याच करता आहे. कैद्याच्या पायातील बेड्या काढून त्याला मोकळे करण्याचा मतलब काय ? हेतू एवढाच की त्याने बाह्य जगात मोकळ्या मनाने वावरून आपल्या अंगी असलेल्या कर्तबगारीचा पूर्ण फायदा घ्यावा म्हणून. परंतु ज्या माणसाचे मन स्वतंत्र नाही त्याला असल्या बाह्यात्कारी स्वातंत्र्याचा काय उपयोग ? मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जरी कैदी नसला तरी तो तुरूंगात आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे. मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे. परंतु मानसिक स्वातंत्र्य वसत आहे, त्याचा लोप झाला नाही, याचा पुरावा काय ? मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल ? जो आपली बुद्धी जागृत ठेऊन आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणतो. जो परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कह्यात आणण्यास सिद्ध असतो, तो माणूस स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो रूढीच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचाराची ज्योत विझली नाही तो स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसऱ्याच्या शिकवणीने वागत नाही, जो कार्यकारणभाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवित नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असता, त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्याच्या हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी, स्वाभिमान ज्याला आंहे तोच माणूस स्वतंत्र आहे, असे मी समजतो. जो आपल्या आयुष्याचे ध्येय व आपल्या आयुष्याचा व्यय दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही, जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवितो, सारांश जो सर्वस्वी स्वाधीन आहे, तोच माणूस स्वतंत्र आहे, असे मी समजतो.
या दृष्टीने पाहिले असता तुम्ही स्वतंत्र आहात काय ? तुमचे आयुष्य व तुमच्या आयुष्याचे ध्येय तुमच्या स्वाधीन आहे काय ? माझ्यामते तुम्हाला स्वातंत्र्य तर नाहीच पण तुम्ही दास आहात, सेवक आहात, इतकेच नव्हे तर तुमच्या दास्यत्वाला सीमा उरली नाही. हिंदू धर्मात कोणालाही विचारस्वातंत्र्य असू शकत नाही. जो जो मनुष्य हिंदू धर्मात राहील त्या त्या माणसाला आपल्या विचारस्वातंत्र्याला तिलांजली दिल्याशिवाय गत्यंतर नाही. वागताना त्याने वेदाप्रमाणे वागले पाहिजे. वेदात तशी आज्ञा नसेल तर स्मृतीतील