३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 552

५०८ डॉ. वाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अस्पृश्यता पाळतात. परस्परात जातीभेद व अस्पृश्यता पाळणाऱ्या लोकांना वरच्या जातीकडून तुम्ही जातीभेद मोडा, अस्पृश्यता मानू नका, असे म्हणण्याचा काय अधिकार आहे ? असा प्रश्‍न नेहमी विचारण्यात येतो. तुम्ही आपसातील जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करा मग आमच्याकडे दाद मागण्यास या, असा साळसूदपणाचा सल्ला त्यांना देण्यात येत असतो. या टीकेच्या मुळाशी असलेल्या कथेत सत्य आहे, हे आपल्यापैकी सर्वांना कबूल करावे लागेल. पण त्या टीकेत केलेला आरोप मात्र खोटा आहे. अस्पृश्य वर्गात समाविष्ट झालेले लोक जातीभेद पाळतात व काही अस्पृश्यता पाळतात, या गोष्टीचा इन्कार करता येणे शक्य नसते. या गोष्टी मान्य करणे. प्राप्त असले तरी या अपराधाला ते कारणीभूत आहेत असे म्हणणे निखालस खोटे आहे. जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम अस्पृश्य लोकांपासून झालेला नाही. जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम वरिष्ठ वर्गाच्या हिंदुच्या हातून झालेला आहे. जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा पायंडा त्यांनी घातला आहे. जातीभेद व अस्पृश्यता पाळण्याचा धडा वरिष्ठ वर्गाच्या हिंदुंनी घालून दिलेला आहे. ही गोष्ट जर सत्य असेल तर जातीभेदाच्या व अस्पृश्यतेच्या रूढीची जबाबदारी स्पृश्य वर्गावरच पडते, अस्पृश्य वर्गावर ती पडू शकत नाही. अस्पृश्य वर्गाचे लोक जातीभेद व अस्पृश्यता पाळताना वरच्या वर्गाच्या लोकांनी दिलेला धडा गिरवीत आहेत. तो धडा जर खोटा आहे तर त्याचे पाप ज्यांनी तो धडा दिला त्यांच्यावरच येऊन पडते. ज्यांनी गिरविला त्यांच्यावर येऊन पडू शकत नाही. हे उत्तर जरी समर्पक असले तरी या उत्तराने माझे स्वतःचे समाधान होऊ शकत नाही. ज्या कारणामुळे जातीभेद व अस्पृश्यता ही आपल्यामध्ये शिरली त्या कारणाला आपण जरी जबाबदार नसलो, तथापि, आपल्यामध्ये जो जातीभेद व जी अस्पृश्यता नांदत आहे तिचा धिक्कार न करणे, ती आहे तशीच चालू देणे आपल्याला इष्ट नाही. अस्पृश्यतेचा व जातीभेदाचा शिरकाव करण्यास जरी आपण जबाबदार नसलो तरी ती घालविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ही जबाबदारी आपण सर्वानी ओळखली आहे, याबद्दल मला समाधान वाटते. माझी खात्री आहे की महार जातीत असा कोणीही पुढारी नाही की जो जातीभेद पाळावा, असे म्हणतो, तुलनाच करावयाची झाली तर ती पुढान्यांमध्येच केली पाहिजे. महारातील शिकलासवरलेला वर्ग घेतला आणि ब्राह्मणातील शिकलासवरलेला वर्ग जर घेतला व दोहोंची तुलना केली तर अस्पृश्य वर्गातील सुशिक्षित वर्ग जातीभेद मोडण्याला जास्त अनुकूल आहे, ही गोष्ट कोणासही कबूल करावी लागेल. इतकेच नव्हे तर ती गोष्ट कृतिनेही सिद्ध करून देता येईल. महारातील सुशिक्षित वर्ग या सुधारणेला अनुकूल आहे इतकेच नव्हे तर, महारातील अडाणी जनता देखील या