३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 553

मुक्ती कोन पथे? ५०९

गोष्टीला अनुकूल आहे, हे सिद्ध करून देता येईल. आज महारांमध्ये असा एकही मनुष्य सापडणार नाही की जो महारमांगात रोटीव्यवहार व बेटीव्यवहार व्हावा, याच्या विरूद्ध असेल. आपल्यातील जातीभेद मोडण्याची आवश्यकता तुम्ही ओळखता या गोष्टीबद्दल मला मोठे समाधान वाटते व मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो. परंतु अस्पृश्यातील जातीभेद मोडण्याचा प्रयत्न कसा यशस्वी करता येईल याचा तुम्ही विचार केला आहे काय ? सहभोजने केल्याने किंवा क्वचित प्रसंगी सहविवाह केल्याने जातीभेद मोडू शकत नाहीत. जातीभेद ही एक मानसिक स्थिती आहे, एक मानसिक व्यथा आहे. ही मानसिक व्यथा जडण्याचे कारण हिंदू धर्माची शिकवण ही आहे. आपण जातीभेद पाळतो, अस्पृश्यता पाळतो याचे मुख्य कारण ज्या हिंदू धर्मात आपण आहोत तो धर्म तसे करावयास सांगतो म्हणून. वस्तू कडू असेल तर ती गोड करता येईल. खारट असेल, तुरट असेल तर तिची रूची बदलता येईल पण विषाचे अमृत करता येणार नाही. हिंदू धर्मात राहून जातीभेद नष्ट करू असे म्हणणे म्हणजे विषाचे अमृत करू असेच म्हणण्यासारखे आहे.

अर्थात ज्या धर्मात माणसाची घाण माणसाने मानली पाहिजे, अशी शिकवण देण्यात येते आहे त्या धर्मात आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या मनातील जातीभेदांची भावना कदापि नष्ट होणार नाही. अस्पृश्यातील जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करावयाची असल्यास त्यांनी धर्मातर करणे हा एकच रामबाण उपाय आहे.

नामांतर आणि धर्मातर

येथपर्यंत धर्मांतराची कारणमीमांसा तुमच्यापुढे मी मांडली आहे. ही कारणमीमांसा तुम्हाला विचारप्रवर्तक होईल, अशी मला आशा आहे. ही कारणमीमांसा ज्यांना खोल आणि गहन अशी वाटत असेल त्यांना या विषयाचा सहज समज पडावा म्हणून मी काही साधे बालबोध विचार तुमच्यापुढे मांडणार आहे. या धर्मांतराच्या प्रश्‍नात नवे असे काय आहे ? खरे म्हटले असता हिंदुंचा आणि तुमचा सामाजिक संबंध काय आहे ? जितके मुसलमान लोक हिंदुपासून भिन्न आहेत तितकेच तुम्हीही हिंदुपासून भिन्न आहात. खिस्ती समाज हिंदू समाजापासून जितका भिन्न आहे तितकेच तुम्हीही हिंदुपासून भिन्न आहात. खिस्ती व मुसलमान यांच्याशी जसा हिंदुचा रोटीबेटी व्यवहार होत नाही, तसा तुमच्याशीही होत नाही. तुमचा आणि हिंदुंचा समाज हे आतासुद्धा निरनिराळे, वेगवेगळाले दोन समाज आहेत. धर्मातर केल्याने एका समाजाचे दोन तुकडे करण्यात आले, असे कोणालाही म्हणता यावयाचे नाही व