५१० डॉ. बावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
कोणालाही वाटावयाचे नाही. आज जसे तुम्ही निराळे आहात तसेच धर्मातर केल्यामुळे निराळे होणार आहात. धर्मांतराने नवे असे काही होणार नाही, हे जर खरे आहे तर धर्मांतराचा बाऊ कोणाला का वाटावा हे मला समजत नाही. दुसरे असे की धर्मांतराचे महत्त्व तुम्हाला जरी पटले नसले तरी नामांतराचे महत्त्व तुम्हा सर्वाना पटले आहे, ही गोष्ट निर्विवाद आहे. तुमच्यापैकी कोणालाही तुझी जात काय म्हणून विचारले तर तो चोखामेळा, हरिजन वगैरे नावे सांगतो. पण महार हे नाव सांगत नाही. नामांतर करण्याची जरूरी पडल्याशिवाय कोणीही नामांतर करणार नाही, अशा प्रकारचे नामांतर करण्याचे कारण अगदी सोपे आहे. अपरिचित अशा माणसाला अस्पृश्य कोण व स्पृश्य कोण हे सांगता येणार नाही आणि म्हणून जोपर्यंत जात कळली नाही, तोपर्यंत स्पृश्य हिंदुच्या मनात कोणत्याही प्रकारची दूषित भावना उत्पन्न होत नाही. प्रवासात अपरिचित स्पृश्य व अस्पृश्य बंधुभावाने वागत असलेले दिसतात. एकमेकांपासून विडीपान घेतात, फळफळावळ घेतात. परंतु त्याच माणसास, ज्याच्याशी आपण व्यवहार करतो त्याची जात कळली व ती अस्पृश्य जात आहे असे समजले की, त्याच्या मनात तिरस्कार उत्पन्न होतो, त्याला तिडीक येते व आपल्याला फसवले म्हणून त्याला क्रोध येऊन प्रवासात जडलेल्या मैत्रीचे पर्यवसान शिवीगाळीत व मारामारीत होते. हा अनुभव पुष्कळांना असेल, अशी माझी खात्री आहे. हा असा प्रकार का होतो, हे तुम्हा सर्वांस अवगत आहे. तुम्हाला जी जातीवाचक नावे प्राप्त झालेली आहेत त्या नावांना इतकी दुर्गधी लागलेली आहे की त्याचा उच्चार केला असताना देखील स्पृश्य लोकांना मळमळून येते आणि म्हणूनच तुम्ही स्वतःला महार न म्हणता, चोखामेळा म्हणून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करता ! परंतु त्याने लोक फसत नाहीत, याचाही तुम्हाला अनुभव आहेच. कारण चोखामेळा म्हटले काय किंवा हरिजन म्हटले काय, लोक जे समजावयाचे ते समजतातच ! तुम्हाला नामांतराची आवश्यकता भासते हे तुमच्या वर्तणुकीनेच तुम्ही सिद्ध केले आहे. मला तुम्हाला एवढेच विचारावयाचे आहे की नामांतर करणे हे जर तुम्हाला अवश्य वाटते तर मग तुम्हाला धर्मातर करण्यास काय हरकत असावी ? धर्मातर हे एका दृष्टीने नामांतरच आहे. धर्मातराने होणारे नामांतर हे तुम्हाला जास्त फायदेशीर पडेल. मुसलमान म्हणवून घेणे, खिस्ती म्हणवून घेणे, बुद्ध म्हणवून घेणे, शीख म्हणवून घेणे हे धर्मांतर आहेच पण नामांतरही आहे. ते खरे नामांतर आहे. या नामांतराला दुर्गधी नाही. हे नामांतर आमूलाग्र आहे. त्याचा शोध कोणी करू शकणार नाही. परंतु चोखामेळा, हरिजन या असल्या नामांतरापासून काही अर्थ नाही. जुन्या नावाची घाण नव्या नावाला लागल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत