३०-५-१९३६ ते १-६-१९३६ मुक्ती कोन पथे ? - Page 555

मुक्ती कोन पथे ? ५११

तुम्हाला नामांतर करावेच लागेल. कारण नुसते हिंदू म्हणवून चालणार नाही. हिंदू हा कोणी मनुष्यप्राणी आहे असे कोणीच ओळखीत नाही. महार असे सांगून भागणार नाही, कारण त्या नावाचा उच्चार केल्याबरोबर कोणी जवळ येणार नाही. असल्या मधल्या स्थितीत घोटाळत राहण्यापेक्षा, आज हे नाव, उद्या ते नाव, असे नामांतर करीत बसण्यापेक्षा धर्मातर करून कायमचे नामांतर तुम्ही का करू नये, असा तुम्हाला माझा प्रश्‍न आहे.

विरोधकांची भूमिका

धर्मातराची चळवळ सुरू झाल्यापासून अनेक लोकांनी त्या चळवळीच्या विरूद्ध अनेक आक्षेप घेतलेले आहेत. त्या आक्षेपात किती सत्य आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. काही हिंदू लोक धार्मिकपणाचा मोठा आव आणून तुम्हाला असे सांगत आहेत की, ' धर्म ही काही उपभोगाची वस्तू नव्हे ! ज्याप्रमाणे आपण आज एक कोट घालतो, दुसऱ्या दिवशी दुसरा घालतो त्याचप्रमाणे धर्मात फेरबदल करता येणार नाही ! हिंदू धर्माला झुगारून देऊन तुम्ही परधर्मात :जाता तर जे तुमचे पूर्वज इतके दिवस या हिंदू धर्मात राहिले ते मूर्ख होते की काय ? ' असा प्रश्‍न काही शहाण्यांनी उपस्थित केला आहे. माझ्या दृष्टीने या आक्षेपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. केवळ पूर्वजांचा धर्म म्हणूनच त्याला चिकटून राहावे हे म्हणणे एखाद्या मूर्खाला शोभू शकेल. कोणीही शहाणा माणूस अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही. केवळ पूर्वजांचा धर्म म्हणून धर्मातर करू नये असे म्हणणाऱ्या लोकांनी इतिहास वाचला नसेल असेच म्हणणे प्राप्त आहे. पूर्वीचा आर्यांचा धर्म, ज्याला वैदिक धर्म म्हणतात, त्यात गोमांस भक्षण करणे, दारू पिणे, स्वैर वर्तन करणे या तीन गोष्टीत मुख्यतः धर्म साठविला 'होता. तो धर्म हजारो वर्षे हिंदुस्थानातील लोकांनी पाळला व अजूनही काही ब्राह्मण लोकांना त्या धर्माकडे जाण्याची हुक्की येते. केवळ पूर्वजांचाच धर्म पाळावयाचा तर वैदिक धर्म सोडून हिंदुस्थानातील लोकांनी बौद्ध धर्म का स्वीकारला ? वैदिक धर्म सोडून जैन धर्म त्यांनी का स्वीकारला ? या धर्मात आपले पूर्वज राहिले ही गोष्ट खरी आहे, परंतु ते लोक स्वसंतोषाने, स्वखुशीने राहिले असे मात्र माझ्याने म्हणवत नाही. या देशात प्रदीर्घ कालपावेतो चातुर्वर्ण्याची संस्था अव्याहत चालू होती. या चातुर्वर्ण्यात ब्राह्मणांनी विद्या शिकावी, क्षत्रियांनी लढाई करावी, वैश्यांनी पैसा मिळवावा व शुद्रांनी सेवा करावी असा नियमबध्द आयुष्यक्रम बांधलेला होता. या आयुष्यक्रमात शूद्र लोकांजवळ विद्या नव्हती, धन नव्हते आणि शस्त्रअस्त्रही नव्हते. अशा विपन्न व निःशस्त्र स्थितीत ज्या तुमच्या पूर्वजांना राहावे लागले, त्यांनी हा धर्म स्वसंतोषाने स्वीकारला