५१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
असे कोणाही शहाण्या माणसास म्हणता येणार नाही. या तुमच्या पूर्वजांना या धर्माविरूध्द बंड करणे शक्य झाले असते काय ? याचा विचार अवश्य करणे प्राप्त आहे. त्यांना बंड करता आले असते व ते त्यांनी केले नसते तर हा धर्म त्यांनी स्वसंतोषाने पत्करला, असे म्हणता आले असते. परंतु खरी वस्तुस्थिती पाहिली असताना त्यांचा निरूपाय झाल्यामुळेच या धर्मात त्यांना राहावे लागले ही गोष्ट निर्विवाद आहे. या दृष्टीने पाहिले असताना हा हिंदू धर्म आमच्या पूर्वजांचा धर्म नसून, तो त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेली एक गुलामगिरी आहे. त्या गुलामगिरीतून आपली सुटका करून घेण्याची साधने त्यांना उपलब्ध नव्हती. म्हणून त्यांना त्या गुलामगिरीविरूध्द बंड करता आले नाही व त्यांना गुलामगिरीतच राहावे लागले याबद्दल त्यांना कोणी दूषण देणार नाही. कोणी झाले तरी त्यांची कीवच करील. परंतु हल्लीच्या पिढीवर तशा प्रकारची जबरदस्ती कोणालाही करता येणार नाही. त्यांना सर्व बाबतीत स्वांतत्र्य आहे. या स्वातंत्र्याचा उपयोग करून जर त्यांनी आपली स्वतःची सुटका करून घेतली नाही तर त्यांच्यासारखे नीच, त्यांच्यासारखे अधम व त्यांच्यासारखे परोपजीवी दुसरे कोणीच नाहीत, असे मोठ्या कष्टाने म्हणावे लागेल.
माणूस आणि पशुतील फरक
केवळ पूर्वजांचा धर्म म्हणूनच त्याला चिकटून राहावे, हे म्हणणे मूर्खाला शोभू शकते. कोणीही शहाणा मनुष्य अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही. ज्या परिस्थितीत मनुष्य सापडला त्याच परिस्थितीत त्याने आजन्म राहावे, हे सांगणे पशूंना शोभेल माणसांना शोभू शकणार नाही. माणसात व पशूत कोणत्या प्रकारची तफावत असेल तर ती हीच की पशू आपली प्रगती करून घेऊ शकत नाही. माणूस आपली प्रगती करून घेऊ शकतो. स्थित्यंतर केल्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. धर्मातर हे एक प्रकारचे स्थित्यंतर आहे आणि जर धर्मातर केल्याशिवाय प्रगती होत नसेल तर धर्मातर करणे आवश्यक आहे. केवळ वडिलांचा धर्म ही बाब प्रगतीप्रिय माणसाच्या आड येऊ शकत नाही. |
धर्मांतराच्या विरूद्ध आणखीही एक मुद्दा सांगण्यात येतो. तो असा की, “ धर्मांतर हा एक प्रकारचा पळपुटेपणा आहे. आज हिंदुंतील अनेक लोक हिंदू धर्माची सुधारणा करण्याकरिता सिद्ध आहेत. त्यांच्या सहाय्याने जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करता येण्यासारखी आहे. अशा समयी धर्मातर करणे सर्वस्वी अयोग्य आहे, “ असे काहींचे म्हणणे आहे. हिंदुंतील समाजसुधारकांबद्दल कोणाचे काय मत असेल ते असो, माझ्या मनात